बोगद्यात अडकलेल्यांशी झाला संपर्क
सर्वजण सुरक्षित असल्याचे स्पष्ट : मदत व बचावकार्य युद्धपातळीवर
वृत्तसंस्था/ देहराडून
उत्तराखंडमधील उत्तरकाशीतील यमुनोत्री महामार्गावर निर्माणाधीन सिल्कयारा बोगद्यात अडकलेल्या मजुरांना वाचवण्यासाठी ढिगारे हटवण्याचे काम सुरू आहे. भुयारी मार्गामध्ये कोसळलेला मातीचा ढिगारा हटवण्यासाठी अवजड यंत्रे लावण्यात आली आहेत. याचदरम्यान बोगद्यात अडकलेल्या कामगारांशी वॉकीटॉकीद्वारे संपर्क साधण्यात आला असून सर्व कामगार सुखरुप असल्याची खाली झाली आहे.
जवळपास 40 कामगार गेल्या दोन दिवसांपासून भुयारी मार्गात अडकून पडले आहेत. अडकलेल्या मजुरांची अन्नाची मागणी केली होती. बोगद्यात पाणीपुरवठा करण्यासाठी टाकलेल्या पाईपलाईनमधून अडकलेल्या कामगारांना रात्रीच्या वेळी खाण्यासाठी काही पॅकेट्स कॉम्प्रेसरद्वारे दाबून पाठवण्यात आली आहेत. तसेच त्यांना ऑक्सिजनचा पुरवठाही केला जात आहे.
बोगद्याच्या आतील पाईपलाईन मदत आणि बचाव कार्यात अत्यंत उपयुक्त ठरत आहेत. कामगारांशी संवाद प्रस्थापित करण्याचे कामही या पाईपलाईनद्वारे
केले जात आहे. प्रत्यक्ष संपर्क होण्यापूर्वी बोगद्यात अडकलेल्या मजुरांना निरोप देण्यासाठी कागदावर लिहिलेल्या संदेशाची स्लिप पाईपलाईनद्वारे पाठवली जात होती. आता खाण्यापिण्याची छोटी पाकिटेही याच पाईपलाईनद्वारे पाठवण्यात आली. रात्रीच्या वेळी अडकलेल्या मजुरांशी संपर्क साधण्यासाठी आणि त्यांना अन्न आणि ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न केले गेले.
मदत आणि बचावकार्यात समन्वय साधण्यासाठी अधिकाऱ्यांना 24 तास कामावर ठेवण्यात आले आहे. रविवारी रात्रीपासून शिफ्टमध्ये समन्वयाचे काम केले जात आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि पोलीस दलासह भुयारी मार्गाचे काम करणारी कंपनी बचावकार्यात पूर्ण क्षमतेने वावरत आहे. मातीचा ढिगारा हटवण्याचे काम वेगाने सुरू असल्याचे मंडळ अधिकारी प्रशांत कुमार यांनी सांगितले. भुयारी मार्गात कोसळलेला ढिगारा सुमारे 60 मीटर लांबीपर्यंत आहे. सोमवारपर्यंत सुमारे 15-20 मीटर ढिगारा उपसण्यात आला. मात्र, माती काढली जात असतानाच पुन्हा माती कोसळत असल्यामुळे समस्या वाढत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
बोगद्याच्या बांधकामासाठी एकावेळी साधारणपणे 12 तासांच्या शिफ्टमध्ये सुमारे 65 ते 70 मजूर काम करतात. मात्र, दिवाळी सणामुळे शनिवारी रात्रीच्या शिफ्टसाठी जवळपास 40 कामगारच हजर झाले होते. हे सर्व कामगार रविवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास बोगद्यात माती कोसळल्यामुळे अडकून पडले आहेत.