For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बांधकाम क्षेत्रालाही पाण्याची कमतरता

10:32 AM Mar 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
बांधकाम क्षेत्रालाही पाण्याची कमतरता
Advertisement

कामगारांसमोर अडचणी : पाण्याविना कामे बंद,  टँकरचा घ्यावा लागतोय आधार

Advertisement

बेळगाव : बांधकाम क्षेत्रालाही पाणीसमस्येच्या तीव्र झळा बसू लागल्या आहेत. त्यामुळे काही ठिकाणी बांधकामे अडचणीत आली आहेत. बांधकाम व्यवसायाशी संबंधित असणारे अभियंते, कंत्राटदार आणि कामगारांची चिंता वाढू लागली आहे. काही ठिकाणी टँकरने पाणी घेऊन कामे सुरू असली तरी पाणीसमस्येने व्यवसायाला ग्रासले आहे. बेळगाव शहरातील पिरनवाडी, टिळकवाडी, नेहरूनगर, महांतेशनगर, रामतीर्थनगर, गांधीनगर आदी ठिकाणी नवीन इमारती बांधल्या जात आहेत. त्यामुळे या कामासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासते. मात्र, शहरात सर्वत्र पाणीसमस्या तीव्र बनू लागली आहे. अशा परिस्थितीत बांधकाम क्षेत्रालाही पाणीसमस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी पाण्याविना कामे बंद ठेवली जात आहेत. त्यामुळे यावर उपजीविका करणारे कामगारही अडचणीत येऊ लागले आहेत. बांधकाम क्षेत्रात सिमेंट आणि वाळूचे मिश्रण करण्यासाठी आणि बांधकाम केलेल्या इमारतीवर पाण्याची नितांत गरज असते. मात्र, नदी-नाले आणि कूपनलिकांच्या पाणीपातळीत घट झाल्याने इमारतींच्या बांधकामासाठी पाणीसमस्या भेडसावू लागली आहे. शासनाने पाणीसमस्येबाबत योग्य ती पावले उचलावीत, अशी मागणीही होऊ लागली आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू केली आहे. त्यामुळे शासनाची विकासकामे ठप्प झाली आहेत. रस्ते बांधणी, पदपथ व सरकारी इमारतींचे बांधकामही तात्पुरते थांबविण्यात आले आहे. मात्र, खासगी कामांना पाणीटंचाई भासू लागली आहे. वाढत्या उष्म्यामुळे भूगर्भातील पाणीपातळी खालावली आहे. त्यामुळे इमारतीच्या बांधकामासाठी खोदलेल्या कूपनलिकांचे पाणीही कमी झाले आहे. त्यामुळे बांधकामासाठी पाण्याची तीव्रता जाणवू लागली आहे. सर्वत्रच पाणीसमस्या गंभीर होत असल्याने पाण्याच्या टँकरची मागणी वाढत असल्याने काही ठिकाणी पाण्याचे टँकर मिळत नसल्याचेही दिसून येत आहे. पैसे मोजले तरी टँकर मिळत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

 97 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा

Advertisement

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या हिडकल व राकसकोप जलाशयांच्या पाणीसाठ्यात घट झाली आहे. त्यामुळे पुढील 97 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे शहरवासियांची चिंताही वाढली आहे. एलअँडटी कंपनीसमोर पाणी नियोजनाचे संकट उभे ठाकले आहे. वळीव पाऊस दमदार झाल्यास काही प्रमाणात पाणीसमस्या कमी होणार आहे.

कामगारांनाही काम मिळणे कठीण

कोरोना काळात बेरोजगार झालेले अनेक जण बांधकाम क्षेत्रात काम करू लागले आहेत. मात्र, बांधकामासाठी पाण्याचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे कामगारांनाही काम मिळेनासे होऊ लागले आहे.

 - अॅड. एन. आर. लातूर (जिल्हा बांधकाम कामगार संघटना अध्यक्ष)

Advertisement
Tags :

.