वाठारमध्ये श्रमदानातून वनराई बंधारा बांधणी; जलसंधारणासाठी ग्रामस्थांचा पुढाकार
वाठार ग्रामस्थांनी श्रमदानातून मोरे ओढ्यावर बांधला वनराई बंधारा
वाठार : उपक्रमशील दृष्टिकोन ठेवून संस्कृतीचा वसा घेऊन समृद्धीकडे गावाने वाटचाल करावी, या उद्देशाने कराड तालुक्यातील वाठार ग्रामपंचायत, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री समुद्ध पंचायतराज अभियानांतर्गत श्रमदानातून गाव शिवारातील मोरे ओढा येथे वनराई बंधारा बांधला.
अभियानात गावातील दानशूर बंडा गोपाळा मुकादम विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक संजय लखापती, कोळेकर, सरपंच भाग्यश्री पाटील, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ शैलेश पाटील, रवि पाटील, संतोष देसाई, बचत गट पदाधिकारी सुषमा देसाई-आवळकर, ग्रामपंचायत कर्मचारी अनिकेत माने, शिवाजी शिंदे, संदीप माने, विजय गावडे, संतोष डोईफोडे यांनी सहभाग नोंदवला.
ग्रामीण भागातील जलसंधारणाला चालना देण्यासाठी आणि भूजल पातळी वाढवण्यासाठी ग्रामपंचायतीचे वतीने हा उपक्रम राबविण्यात आला असल्याची माहिती ग्रामपंचायत अधिकारी संजय लिंबळे यांनी दिली. या उपक्रमात दोन बंधाऱ्याचे नियोजन असून एक बंधारा पूर्ण करण्यात आला आहे. केवळ पारितोषिक मिळवणे, हा या अभियानाचा उद्देश नसून गाव जास्तीत जास्त आत्मनिर्भर कसे होईल? हा यामागील उद्देश असल्याचे सरपंच भाग्यश्री पाटील यांनी सांगितले.