अमरनाथ गुहेपर्यंत रस्त्याची निर्मिती
वाहनाने थेट गुहेपर्यंत पोहोचता येणार
वृत्तसंस्था/ जम्मू
अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांना केंद्र सरकारने मोठी भेट दिली आहे. मोदी सरकारने गुहेपर्यंत जाणाऱ्या पर्वतीय रस्त्याचे रुंदीकरण केले आहे. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने अमरनाथ गुहेपर्यंत वाहनांचा ताफा पोहाचविला आहे. अमरनाथ गुहेपर्यंत वाहने पोहोचण्याची ही पहिलीच वेळ आहे. अमरनाथच्या पवित्र गुहेपर्यंत रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे.
अमरनाथ गुहेपर्यंत जाणाऱ्ल्या रस्त्याच्या देखभालीची जबाबदारी मागील वर्षी बीआरओकडे सोपविण्यात आली होती. बीआरओच्या ‘प्रोजेक्ट बीकन’मध्ये अमरनाथ यात्रा मार्गाच्या सुधारणेचे काम सामील आहे.
परंतु मेहबुबा मुफ्ती यांच्या पीडीपीने या रस्त्याला विरोध केला आहे. रस्तेनिर्मितीचे हे कार्य निसर्गाच्या विरोधात आहे. तसेच हिंदू धर्म आणि निसर्गावरील श्रद्धेच्या विरोधात हा मोठा गुन्हा आहे. हिंदू धर्म पूर्णपणे अध्यात्मिक आणि निसर्गासोबत एकरुप होणारा आहे. या रस्त्याच्या कार्यामुळे निसर्गाला मोठा धक्का पोहोचल्याचा दावा पीडीपी प्रवक्ते मोहित भान यांनी केला आहे.
अमरनाथ गुहा पवित्र हिमालयाच्या कुशीत आहे. राजकीय लाभासाठी धार्मिक स्थळांना पिकनिक स्पॉटमध्ये बदलणे चुकीचे आहे. आम्ही देवाचा प्रकोप जोशीमठ, केदारनाथमध्ये पाहिला आहे, तरीही यातून धडा न घेत काश्मीरमध्ये आपत्तीला आमंत्रण देत आहोत अशी टीका पीडीपीने केली आहे.
तर भाजपने पीडीपीच्या टीकेवर प्रत्युत्तर दिले आहे. लोक समजूतदार असून फसवणुकीच्या राजकारणाला बळी पडणार नाहीत. पीडीपी अमरनाथ गुहेपर्यंतच्या रस्त्याला विरोध करून 2008 च्या भूमी वादाला पुन्हा जन्म देऊ पाहत असल्याचा आरोप भाजपने केला आहे.