जपानमध्ये लाकडी उपग्रहाची निर्मिती
जगातील पहिला लाकडी उपग्रह तयार करत जपानने तो अंतराळाच्या दिशेने प्रक्षेपित केला आहे. हातात मावू शकेल इतक्या आकाराचा हा उपग्रह म्हणजेच लिग्नोसॅट प्रथम आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात नेण्यात येणार आहे. यानंतर त्याला 400 किलोमीटर उंचीवरील कक्षेत स्थापित करण्यात येईल. प्रक्षेपण स्पेसएक्सच्या रॉकेटद्वारे करण्यात आले आहे.
लाकडाने निर्मित उपग्रह अंतराळात टिकू शकतो हे जाणून घेण्याचा जपानचा प्रयत्न आहे. हा उपग्रह अंतराळात तग धरून राहू शकल्यास भविष्यात लाकडाच्या मदतीने चंद्र, मंगळ यासारख्या ग्रहांवर माणसांसाठी घर निर्माण करणे सोपे ठरणार आहे. कारण लाकूड हे कुठल्याही अन्य धातूच्या तुलनेत हलके जाते, रिन्युएबल असते.
जपानचे अंतराळावीर ताकाओ दोई यांनी लिग्नोसॅट आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक आणि अंतराळाच्या रेडिएशनला सहन करू शकल्यास भविष्यात यामुळे मोठी मदत मिळणार असल्याचे म्हटले आहे. लाकडाला चंद्र आणि मंगळ ग्रहावर नेण्याची तयारी आहे. पुढील 50 वर्षांमध्ये प्रक्षेपित होणाऱ्या मोहिमांमध्ये यामुळे मोठी मदत होणार नाहे. नासाने हा उपग्रह निर्माण करण्यास मदत केल्याचे दोई यांनी सांगितले आहे.
लाकूड सडणार नाही
1900 च्या प्रारंभी विमान देखील लाकडानेच निर्माण केले जात होते. याचमुळे लाकडाद्वारे उपग्रह निर्माण करणे शक्य आहे. लाकूड अंतराळात अधिक काळापर्यंत टिकून राहिल, कारण अंतराळात त्याला जाळणे किंवा सडविण्यासाठी कुठलेच पाणी, हवा, ऑक्सिजन किंवा आग नाही असे क्योटो विद्यापीठाचे फॉरेस्ट सायंटिस्ट कोजी मुराता यांनी सांगितले आहे.
उच्च तापमानात होणार पडताळणी
या उपग्रहाला होनोकी नावाच्या वृक्षाच्या लाकडाद्वारे निर्माण करण्यात आले ओ. हा मॅग्नोलिया प्रजातीचा वृक्ष आहे. हा 10 महिन्यांचा प्रयोग आहे.10 महिन्यांपर्यंत हा उपग्रह अंतराळ स्थानकावर राहणार आहे. यानंतर त्याला अंतराळात सोडण्यात येईल. मग हा उपग्रह अंतराळाच्या कक्षेत फिरत राहणार आहे. यादरम्यान त्याच्या इलेक्टॉनिक यंत्रांना ऑन करून त्याचे काम पाहिले जाणार आहे. उणे 100 ते 100 अंश सेल्सिअस तापमानात त्याची पडताळणी केली जाणार आहे. दर 45 मिनिटांनी या उपग्रहाची स्थिती तपासण्यात येणार आहे.