For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

धारगळ दोन खांब जंक्शनवर उड्डाणपूल उभारा

11:37 AM Nov 27, 2023 IST | Tarun Bharat Portal
धारगळ दोन खांब जंक्शनवर उड्डाणपूल उभारा
Advertisement

तुये, पार्से पंचायत शिष्टमंडळाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन : उपाय योजना करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Advertisement

पेडणे : राष्ट्रीय महामार्ग 66 वरील धारगळ दोन खांब या ठिकाणी असलेले जंक्शन धोकादायक ठरत असून या जंक्शनवर आतापर्यंत  अनेक अपघात झाले आहेत. अपघातांचे गांभिर्य लक्षात घेऊन या ठिकाणी उड्डाणपूल उभारावा, अशी मागणी करणारे निवेदन मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांच्या उपस्थितीत तुये, पार्से  पंचायतीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना सादर केले. उड्डाणपूल हा केंद्र सरकारच्या मान्यतेनुसार उभारण्यात येतो. त्यासंबंधी आपण केंद्रीय रस्ता वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे चर्चा करून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी शिष्टमंडळाला सांगितले. धारगळ दोन खांब या रस्त्यावरून पार्से, तुये, आरोबा, शिरगाळ या भागातील लोक कामानिमित्ताने ये-जा करत असतात.  महामार्गावरील वाहने वेगाने येत असल्याने या जंक्शनवर दर आठवड्याला लहान-मोठे एक, दोन अपघात घडतात.

सरकारने याची गंभीर दखल घेऊन या ठिकाणी उड्डाणपूल उभारावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. धारगळ दोन खांब या ठिकाणी रस्त्याचे काम सुरू करतानाच उड्डाणपूल होणार होता. परंतु धारगळवासीयांनी निवेदन देऊन हा पूल रद्द करावा, अशी मागणी केल्यामुळे तो उड्डाणपूल रद्द केला. परंतु आता सरपंचांची मागणी लक्षात घेऊन आपण केंद्र सरकारकडे चर्चा करून या ठिकाणी उपाययोजना केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली. धारगळ दोन खांब जंक्शन हा परिसर अत्यंत धोकादायक आहे. या ठिकाणी उड्डाणपूलची गरज आहे. येथे उड्डाणपूल उभारावा यासाठी तुये, पार्से पंचायतीमार्फत मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना निवेदन सादर केले आहे. मुख्यमंत्री यावर   उपाययोजना करतील याचा आपल्याला विश्वास आहे, असे आमदार जीत आरोलकर यांनी सांगितले.

Advertisement

Advertisement
Tags :

.