बेळगावमध्ये ऊर्दू भवन निर्माण करा
ऊर्दू घर कमिटीची राज्य सरकारकडे मागणी
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यामध्ये ऊर्दू बोलणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. ऊर्दू ही भारतातील स्थानिक भाषा असून केवळ मुस्लीमच नाही तर इतर भाषिकही या भाषेचा वापर करतात. मागील 20 वर्षांपासून बेळगावमध्ये ऊर्दूच्या संवर्धनासाठी ऊर्दू भवन बांधण्याची मागणी होत असून राज्य सरकारने यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी बेळगावच्या ऊर्दू घर कमिटीच्यावतीने शुक्रवारी राज्य सरकारकडे करण्यात आली.
बेळगाव परिसरात अनेक ऊर्दू भाषिक शाळा आहेत. त्याचबरोबर ऊर्दू बोलणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. भाषेच्या संवर्धनासाठी सध्या सुभाषनगर येथे खासगी मालमत्तेत एक ऊर्दू ग्रंथालय, मोफत ऊर्दू संगणक प्रशिक्षण केंद्र व ऊर्दू शिक्षण केंद्र स्थापन करण्यात आले आहे. समाजातील देणगीदारांच्या निधीतून हे केंद्र चालवले जात आहे. त्यामुळे जर ऊर्दू भवन निर्माण केले तर एकाच ठिकाणी ऊर्दू शिकणाऱ्यांची सोय होईल, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी शर्फुद्दिन मोकाशी, मोमीन दफेदार, नगरसेवक शाहिदखान पठाण, वाजिदखान पठाण, अरिफ कटगेरी यांच्यासह ऊर्दू घर कमिटीचे सदस्य उपस्थित होते.