कोन्स्टासच्या शतकाने ऑस्ट्रेलिया अ सुस्थितीत
कँपबेल केलावे, कूपर कोनोली यांची अर्धशतके, दुबेचे 3 बळी
वृत्तसंस्था / लखनौ
येथे मंगळवारपासून सुरू झालेल्या चार दिवसांच्या पहिल्या अनधिकृत कसोटीत सॅम कोन्स्टासच्या दमदार शतकाने ऑस्ट्रेलिया अ संघाने दिवसअखेर पहिल्या डावात 5 बाद 337 धावा जमविल्या. भारत अ संघातील हर्ष दुबेने 88 धावांत 3 गडी बाद केले.
या सामन्यात ऑस्ट्रेलिया अ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सॅम कोन्स्टास आणि कॅम्पबेल केलावे या सलामीच्या जोडीने 37.1 षटकात 198 धावांची भागिदारी केली. केलावेने 97 चेंडूत 2 षटकार आणि 10 चौकारांसह 88 धावा झळकविल्या. ऑस्ट्रेलिया अ ची ही सलामीची जोडी फुटल्यानंतर त्यांचे मधल्या फळीतील दोन फलंदाज लवकर बाद झाले. कर्णधार मॅक्स्वीनीने केवळ एक धाव जमविली. हर्ष दुबेने त्याला पायचीत केले. तत्पूर्वी ब्रारने केलावेला कोटियनकरवी झेलबाद केले. खलील अहमदने ऑलिव्हर पी.के.ला 2 धावांवर पायचीत केले. सॅम कोन्स्टासने 144 चेंडूत 3 षटकार आणि 10 चौकारांसह 109 धावा झळकविल्या. दुबेने त्याचा त्रिफळा उडविला.
कोनोली आणि स्कॉट या जोडीने पाचव्या गड्यासाठी 109 धावांची शतकी भागिदारी केली. दुबेने कोनोलीला झेल बाद केले. त्याने 84 चेंडूत 1 षटकार आणि 12 चौकारासह 70 धावा जमविल्या. दिवसअखेर स्कॉट 2 षटकार आणि 3 चौकारांसह 47 तर फिलीपी 3 धावांवर खेळत आहे. ऑस्ट्रेलियाने 73 षटकात 5 बाद 337 धावांपर्यंत मजल मारली आहे. दुबेने 88 धावांत 3 तर खलिल अहमद आणि ब्रार यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया प. डाव 73 षटकात 5 बाद 337 (कोन्स्टास 109, केलावे 88, कोनोली 70, स्कॉट खेळत आहे 47, अवांतर 17, दुबे 3-88, खलिल अहमद आणि ब्रार प्रत्येकी 1 बळी)