हवालदार सर्वेश खांडोळकर निलंबित
सिद्दीकी उर्फ सुलेमानचा जामीन अर्ज फेटाळला : सुनील कवठणकर यांची दोन तास चैकशी
पणजी : आरोपी सुलेमान सिद्दीकी खान पलायन प्रकरणात अमित नाईक याला बडतर्फ करण्यात आल्यानंतर गुन्हा अन्वेषण विभागात सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या आयआरबी पोलिस पथकाचा प्रमुख हवालदार सर्वेश खांडोळकर याला काल मंगळवारी निलंबित करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान सुलेमान खान याने म्हापसा येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला असता न्यायाधीशांनी फेटाळून लावला आहे. सर्वेश खांडोळकर याने आपल्या कामात निष्काळजीपणा केल्याने सुलेमानच्या पलायनाचा प्रकार घडल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. सध्या सिद्दीकी उर्फ सुलेमान फरारी असून त्याला पकडण्यासाठी अनेक पथके कार्यरत आहेत.
जमीन हडप प्रकरणातील मुख्य आरोपी सिद्दीकी उर्फ सुलेमान खान याला कोठडीतून पलायन करण्यास मदत केल्यास आपणास 3 कोटी ऊपये मिळणार म्हणून कॉन्स्टेबल अमित नाईकने त्याला मदत केली होती. मात्र हा डाव त्याच्यावर उलटला आणि त्याचे स्वप्नही भंग पावले. सिद्दीकीने त्याला फसविले आणि उलट जीव वाचविण्यासाठी पोलिसांना शरण यावे लागले. संशयित अमित नाईक याला कौटुंबिक समस्या होत्या. 3 कोटी ऊपये घेऊन त्याला सर्वांपासून दूर रहायचे हेते असे चौकशीदरम्यान संशयित अमित नाईकने पोलिसांना सांगितले. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी अमित नाईक याची कसून उलटतपासणी केली. सुलेमानकडून मिळणाऱ्या पैशातून काही मालमत्ता विकत घेऊन सर्वांपासून दूर राहण्याचे स्वप्न त्यांने पाहिले होते, चौकशीच्यावेळी त्याने पोलिसांना सांगितले आहे.
सुनील कवठणकर यांची दोन तास उलटतपासणी
सिद्दीकी उर्फ सुलेमान खान याच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओत ज्या पोलिसांची नावे सुलेमानने घेतलेली आहेत त्यांची चौकशी व्हायला पाहिजे. तसे न करता पोलिस आपलीच चौकशी करत आहेत. आपल्याला वेगवेगळ्या तारखेचे तीन समन्स बजावण्यात आले आहेत. आपण काल मंगळवारी ओल्ड गोवा पोलिसस्थानकात तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहिलो, असे काँग्रेसचे सुनील कवठणकर यांनी पत्रकारांना सांगितले.
कवठणकर यांची काल मंगळवारी दोन तास चौकशी झाली. यावेळी त्यांच्या समवेत आपचे वाल्मिकी नाईक, काँग्रेसचे तुलियो डिसोझा उपस्थित होते. घर कुठे आहे, घरात किती वर्षे रहातोस अशा प्रकारचे तपासाशी कसलाही संबंध नसलेले प्रश्न पोलिसांनी आपल्याला विचारले. पोलिसांनी आपल्या मोबाईलचीही मागणी केली, पण मोबाईल देण्यास आपण नकार दिला. अटकपूर्व जामिनासाठी आपण अर्ज करणार नसून अटकेस सामोरे जाण्याची आपली तयारी आहे. सुलेमानने पोलिसांसह आमदारावरही आरोप केलेले आहेत. पोलिस व आमदाराची चौकशी न होता विरोधकांची चौकशी होत आहे, असे सांगून पोलिस दबावाखाली तपास करत असून विरोधकांची सतावणूक होत असल्याचा आरोप कवठणकर यांनी केला.
चोर सोडून सन्याशाला फाशी देण्यास पोलिस पाहत आहे. अमित नाईक हा सिद्दीकीला घेऊन जात असतानाचा व्हिडीओ कसा व्हायरल झाला? कारण ती फुटेज गुन्हा अन्वेषण विभागातील आहे. याचाच अर्थ तो व्हिडीओ व्हायरल करून लोकांना काही वेगळाच प्रकार दाखविण्याच प्रयत्न पोलासांनी केला आहे. पोलिसांनी 11 डिसेंबर आणि 12 डिसेंबर या दोन्ही दिवसाचे सीआयडी कार्यालयातील व्हिडिओ फुटेज व्हायरल करावे. नंतर लोकांना खरा प्रकार काय आहे ते कळणार असेही अमित पालेकर यांनी सांगितले.
अमितचे स्वप्न भंगले... असंगाशी संग नडला!
अमित नाईकचे कुटुंब मूळ कर्नाटकातील असून गोव्यात ते कामासाठी आले होते. सुरवातीला त्याचे वडील वास्को बायणा येथे मिक्सर दुऊस्त करण्याचे काम करीत होते. तिथेच त्यांनी वास्तव्य केले होते. त्यानंर काही वर्षानी ते वास्को येथे रहायला आले. अमित नाईक याचा जन्म गोव्यात झाला. त्याला एक भाऊ होता तो विदेशात नोकरी करीत होता. आर्थिक स्थिती चांगली झाली होती. नंतर त्यांनी जयरामनगर दाबोळी येथे व्हिला विकत घेतला. काही दिवसांनी त्याच्या भावाचा विदेशातच मृत्यू झाला. वडीलांचेही वय झाले असल्याने कुटुंबाची जबाबदारी अमित नाईकवर आली. सध्या तो कुटुंबासमवेत जयरामनगर दाबोळी येथे राहत होता. तो एक चांगला क्रीडापटू असून कराटेही शिकला आहे. 2013 मध्ये तो आयआरबी पोलिसात ऊजू झाला होता. त्यानंतर त्याचे लग्न झाले. त्याला एक छोटा मुलगाही आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याला कौटुंबिक समस्या सतावत होत्या.