बदलीच्या आमिषाने कॉन्स्टेबललाच १३ लाखाचा गंडा
स्थानिक गुन्हे शाखेकडून भामट्याला अटक
कोल्हापूर
मंत्री,वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना सांगून महामार्ग वाहतूक शाखेकडे बदली करून देतो, असे सांगून एका भामट्याने जयसिंगपूर पोलिस ठाण्यातील कॉन्स्टेबलला १३ लाख ६० हजार रुपयांचा गंडा घातला. कॉन्स्टेबल प्रमोद नरसिंगा बेनाडे (वय ५१, रा. रुई, ता. हातकणंगले) यांनी शनिवारी (दि. ८) शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मनोज प्रकाश सबनीस (३२,रा.तारदाळ,हातकणंगले) या भामट्याला अटक केली. त्याला ११ फेब्रुवारी पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली.
फिर्यादी कॉन्स्टेबल प्रमोद बेनाडे हे जयसिंगपूर पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यांच्या परिचयातील मनोज सबनीस हा पोलिसांच्या बदल्या करून देत असल्याचे सांगत होता. मंत्री,वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी असलेल्या ओळखीतून महामार्ग वाहतूक शाखेकडे बदली करून देण्याचे आमिष त्याने बेनाडे यांना दाखवले. यासाठी १ डिसेंबर २०२३ ते ३० एप्रिल २०२४ या कालावधित त्याने बेनाडे यांच्याकडून वेळोवेळी १३ लाख ६० हजार रुपये उकळले.काही रक्कम परिख पूल येथील इन्डसइंड बँकेत खात्यावर भरून घेतली. तर रक्कम रोख आणि गुगल पे द्वारे घेतली.गुन्हा दाखल झाल्यावर स्थानिक गुन्हे शाखेने अटक करुन पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.