आप समर्थकांची नावे मतदारयादीतून वगळण्याचा कट
केजरीवालांचा भाजपवर आरोप
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक पत्रकार परिषद घेत शुक्रारी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. दिल्लीत भाजप गुपचूपपणे मतदारांची नावे यादीतून वगळू पाहत आहे. शाहदरा मतदारसंघात मागील एक महिन्यात भाजपने 11 हजार 18 जणांची नावे मतदारयादीतून वगळण्यासाठी अर्ज केला आहे. भाजपकडून 1000-5000 जणांची नावे मतदार यादीतून वगळण्यासाठी अर्ज केले जात असल्याचा दावा केजरीवाल यांनी केला आहे.
भाजपने स्वत:च्या लेटरहेडवर अशाप्रकारचा अर्ज केला आहे. मागील एक ते दीड महिन्यात भाजपने 11 हजार लोकांची नावे मतदारयादीतून वगळण्यासाठी अर्ज केले आहेत आणि ही प्रक्रिया सुरू आहे. संबंधित 11,018 लोक हे अन्यत्र स्थलांतरित झाले आहेत किंवा त्यांचा मृत्यू झाला आहे असे या अर्जांमध्ये नमूद आहे. आम्ही यातील 500 जणांची रँडम पद्धतीने तपासणी केली. या 500 पैकी 372 जण नमूद पत्त्यावर राहत होते. म्हणजेच भाजपने दिलेली यादीच चुकीची आहे. तसेच संबंधित लोक हे आम आदमी पक्षाचे समर्थक असल्याचे आम्हाला आढळून आले. एका विधानसभा मतदारसंघातील 6 टक्के मतदारांची नावे यादीतून हटविण्यात आली तर निवडणूक करविण्याचा अर्थच काय उरतो? मतदारसंघात एक लाख 86 हजारांच्या आसपास मतदार आहेत, भाजपने यातील 11 हजार मतदारांची नावे वगळण्यासाठी अर्ज केला आहे, अजून किती अर्ज केले जातील हे ठाऊक नाही असे केजरीवालांनी म्हटले आहे.
निवडणूक आयोगाची भूमिका यात संशयास्पद आहे. या लोकांची नावे हटविण्यासाठी अर्ज दाखल होतो, त्यांची यादी आयोगाला वेबसाइटवर प्रसारित करावी लागते. परंतु हे करण्यात आलेले नाही. नावे वगळण्यासंबंधी केवळ 487 अर्ज दिसून येत आहेत. निवडणूक आयोग लपून छपून भाजपच्या अर्जांवर काम करत आहे असा आरोप केजरीवालांनी केला आहे.