केजरीवाल यांना मारण्याचा कट !
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांची हत्या करण्याचा कट रचण्यात आला आहे, असा गंभीर आरोप या पक्षाने केला आहे. केजरीवाल यांच्या जीवाला धोका उत्पन्न झाल्यास त्याचे उत्तरदायित्व भारतीय जनता पक्षावर असेल, असेही प्रतिपादन करुन या पक्षाच्या नेत्यांनी अप्रत्यक्षरित्या भारतीय जनता पक्षावर हा कट केल्याचा आरोप केला आहे.
शनिवारी या पक्षाचे राज्यसभा सदस्य संजयसिंग यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. तीन दिवसांपूर्वी दिल्लीच्या विकासपुरी भागात केजरीवाल यांच्या पदयात्रेवर हल्ला करण्यात आला. हा हल्ला भारतीय जनता पक्षाच्या गुंडांनी केला असा आरोप त्यांनी केला. हा हल्ला होत असताना पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. यावरुन हल्ला कोणी केला आहे, हे स्पष्ट होते. विकासपुरी येथे हल्ला झाला असला तरी, केजरीवाल दिल्लीच्या विविध भागांमध्ये पदयात्रा काढण्याचा आपला पूर्वनियोजित कार्यक्रम चालूच ठेवतील असे त्यांनी स्पष्ट केले.
तक्रार का सादर केली नाही ?
हा हल्ला झाल्यानंतर आम आदमी पक्ष किंवा केजरीवाल यांनी पोलिसात तक्रार का सादर केली नाही, असा प्रश्न त्यांना पत्रकारांनी विचारला. यावर, पोलिसांनी त्यावेळी नि:पक्षपाती भूमिका घेतली असती, तर हा हल्ला झालाच नसता, अशी टिप्पणी करत संजयसिंग यांनी मूळ प्रश्नाला बगल दिली. हल्लेखोर हे भारतीय जनता पक्षाच्या युवा शाखेचे कार्यकर्ते होते, असा आरोपही त्यांनी केला.