For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

देशात विविध ठिकाणी स्फोट घडवण्याचा कट

06:58 AM Apr 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
देशात विविध ठिकाणी स्फोट घडवण्याचा कट
Advertisement

कर्नाटकसह तीन राज्ये निशाण्यावर : अटकेतील ‘आयएस’ संशयितांची एनआयए अधिकाऱ्यांसमोर कबुली

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

बेंगळूरमधील रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोटप्रकरणी अटक करण्यात आलेल्या  दोन संशयित दहशतवाद्यांनी कर्नाटकाव्यतिरिक्त देशाच्या अनेक भागांमध्ये घातपात  घडवून आणण्याची तयारी केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.

Advertisement

राष्ट्रीय तपास पथकाच्या (एनआयए) अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासातून ही बाब  समोर आली आहे. कर्नाटकसह केरळ आणि महाराष्ट्रात त्यांनी बॉम्बस्फोट घडविण्याची योजना आखली होती. बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण, पलायन करण्याची योजना आणि प्रवासाचा नकाशा तयार केला होता, अशी माहिती संशयितांनी एनआयएच्या चौकशीवेळी दिली आहे.

रामेश्वरम कॅफेमध्ये बॉम्बस्फोट घटविल्यानंतर संशयित दहशतवादी मागील 43 दिवसांपासून फरार झाले होते. शुक्रवारी पहाटे त्यांना पश्चिम बंगालमध्ये अटक करण्यात आली. आरोपी मुसावीर हुसेन शाजीब आणि अब्दुल मतीन अहमद ताहा यांनी देशातील अनेक ठिकाणी स्फोट घडवून आणण्याची योजना आखल्याची कबुली दिली आहे. दक्षिण भारतातील राज्ये विशेषत: कर्नाटक, केरळ आणि महाराष्ट्र हे या मॉड्यूलचे लक्ष्य होते. या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्फोट घडवून आणण्याची दोन्ही आरोपींची योजना होती. संशयित दहशतवाद्यांचे बॉम्ब बनवण्याचे ठिकाण, त्यांना कोणी मदत केली, स्फोटासाठी रामेश्वरम कॅफे का निवडला, आणखी कुठे स्फोटांची योजना होती, स्फोटकांची तीव्रता किती होती, याबाबत एनआयए अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी केली असून पुढील तपास सुरू केला आहे.

अनेक राज्यांमध्ये मॉड्यूलचा विस्तार

एनआयएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर आयएसआयएस खोरासानच्या सूचनेनुसार हे मॉड्यूल गेल्या तीन वर्षांपासून चालवले जात आहे. अब्दुल मतीन आणि मुसाबीर यांना परदेशातून सूचना मिळत होत्या, असाही गुप्तचर यंत्रणेचा विश्वास आहे. आयएसआयएस अल हिंद मॉड्यूल देशासाठी मोठा धोका आहे. अल हिंद मॉड्यूलचे स्लीपर सेल अनेक राज्यांमध्ये पसरल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. आता अटकेतील आरोपींच्या चौकशीतून त्यांच्या सहकाऱ्यांना धोबीपछाड करण्याचे आव्हान तपास यंत्रणांसमोर आहे.

बंगालमध्येच का घेतला आसरा?

बॉम्बस्फोट घडवणारे संशयित अब्दुल मतीन ताहा हा चेन्नईत विघ्नेश, कोलकात्यात अनमोल कुलकर्णी अशा बनावट नावांनी वावरत होता. बॉम्बस्फोट घडविणारा मुसावीर हुसेन शाजीब हा चेन्नईत मोहम्मद जुनैद सय्यद आणि कोलकात्यात युशू शाहनवाज पाटील अशी नावे लावून फिरत होता. आपली खरी ओळख लपविण्यासाठी ते दोघे बनावट आधारकार्ड वापरत होते. अखेर आरोपीना  अटक करण्यात यश मिळण्यास बनावट सीमकार्डचा वापर हे एक प्रमुख कारण आहे.

बनावट आधार कार्ड

पश्चिम बंगालमध्ये बनावट आधार कार्ड वापरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरित बहुतेकदा बनावट आधारकार्ड वापरतात. त्यामुळे संशयित दहशतवाद्यांनी या भागामध्ये आसरा घेतला असावा, असा संशय व्यक्त झाला. या संशयाच्या आधारे एनआयएने तपास सुरू ठेवला होता.

गेल्या 12 दिवसांपासून कोलकात्यात लपलेले आरोपी एका ठिकाणी न राहता लॉज बदलत होते. कोलकाता येथील मिधीनापूरमध्ये त्यांनी दर दोन ते तीन दिवसांनी राहण्याची जागा बदलली. आरोपींनी दोन दिवसांपूर्वी मिधीनापूर दिघाजवळील लॉज बदलून कोलकाता येथील हॉटेल पॅराडाईज आणि लेनिन सेरानीसह अनेक हॉटेल्समध्ये वास्तव्य केले होते.

नावे बदलून वावर

संजय अगरवाल, उदय दास, यशू पटेल, विघ्नेश अशा विविध बनावट नावांनी वावरत होते. मुसावीर हुसेन याने महाराष्ट्रातील पालघर जिह्यातील बनावट आधार कार्ड मिळविले होते. तर मतीनने कर्नाटकातील विघ्नेश आणि अमोल कुलकर्णी यो नावांनी बनावट कागदपत्रेही दिली. त्यांनी लॉचच्या कर्मचाऱ्यांना संजय अगरवाल आणि उदय दास अशी ओळख सांगितली तसेच आपण मूळचे झारखंड आणि त्रिपुराचे असल्याचे भासविले होते.

ताहा अभियंता

रामेश्वरम कॅफेत स्फोट घडविण्यासाठी बॉम्ब अब्दुल मतीन ताहा याने बनविल्याची माहिती समोर आली आहे. अभियांत्रिकी पदवीधर असलेल्या अब्दुल ताहाला बॉम्ब बनविण्याचे ज्ञान होते. तो इतरांनाही प्रशिक्षण देत होता.

ताहा मास्टरमाईंड

मास्टरमाईंड अब्दुल मतीन ताहाचे वडील माजी सैनिक होते. वर्षभरापूर्वी त्यांचे निधन झाले. ताहा हा एक अतिशय हुशार अभियांत्रिकी पदवीधर आहे. शिमोगा जिल्ह्याच्या तीर्थहळ्ळी येथे माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. बेंगळूरमध्ये अभियांत्रिकी पदवी पूर्ण केली. याच वेळी तो दहशतवाद्यांच्या संपर्कात आला. आयईडी बॉम्ब बनवण्यात तरबेज होता. मंगळूर कुकर बॉम्बस्फोट व शिमोगा येथील ट्रायल बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड असलेला मतीन ताहा गेल्या चार वर्षांपासून बेपत्ता होता. यापूर्वी एनआयएने त्याला शोधण्यासाठी तीन लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. रामेश्वरम कॅफे स्फोटात मुसावीरचा सहभाग असल्याचे समजल्यानंतर त्याच्यावर दहा लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.

आरोपींना 10 दिवस एनआयए कोठडी

रामेश्वरम कॅफेतील बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी मुसावीर हुसेन शाजीब आणि अब्दुल मतीन अहमद ताहा यांना 10 दिवसांची एनआयएच्या ताब्यात देण्यात आले आहे. आरोपींना 12 एप्रिल रोजी पहाटे पश्चिम बंगालमध्ये अटक करण्यात आली होती. त्यांना शनिवारी सकाळी 10:30 वाजता बेंगळूरच्या कोरमंगल येथील निवासस्थानी न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आले असता 10 दिवसांसाठी एनआयएच्या ताब्यात देण्यात आले आहे. न्यायाधीशांसमोर हजर करण्यापूर्वी शुक्रवारी रात्री बेंगळुरात आणण्यात आल्यानंतर आरोपींची मडिवाळ येथील इंटिग्रेशन सेलमध्ये कसून चौकशी करण्यात आली. मुसावीर हुसेन शाजीब आणि अब्दुल मतीन अहमद ताहा या दोघांना कोलकाता येथील सुभाषचंद्र बोस विमानतळावरून इंडिगो विमानाने मध्यरात्री 12:45 वाजता बेंगळुरात आणण्यात आले.

Advertisement
Tags :

.