व्हेनेझुएला अध्यक्षांच्या हत्येचा कट उघड
6 जणांना अटक : अमेरिकन नेव्ही कमांडो सामील
वृत्तसंस्था/ कराकस
दक्षिण अमेरिकन देश व्हेनेझुएलामध्ये अध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी अमेरिकन नेव्ही सील कमांडो समवेत 6 विदेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. व्हेनेझुएलाचे गृहमंत्री डियोसडाडो कबेलो यांनी हत्येचा हा कट अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा सीआयएने रचला होता असा दावा केला आहे.
अमेरिकन कमांडोसोबत अमेरिकेचे आणखी दोन नागरिक, स्पेनचे 2 नागरिक आणि चेक प्रजासत्ताकच्या एका नागरिकाला अटक करण्यात आली आहे. याचबरोबर अधिकाऱ्यांनी संबंधितांकडून 400 अमेरिकन रायफल्स हस्तगत केल्याची माहिती अध्यक्ष मादुरो यांनी एका पत्रकार परिषदेत दिली आहे.
अनेक नेत्यांच्या हत्येचा होता कट
सीआयसोबत या कटात स्पेनचे नॅशनल इंटेलिजेन्स सेंटर देखील सामील होते. अध्यक्ष मादुरोसमवेत उपाध्यक्ष आणि अन्य अनेक राजकीय नेत्यांची हत्या करण्याचा प्रयत्न होता असा आरोप कबेलो यांनी केला. तर अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाने व्हेनेझुएलाचे आरोप फेटाळले आहेत. अमेरिकेच्या नागरिकांच्या अटकेशी निगडित महत्त्वाची माहिती जमविण्याचा प्रयत्न करत आहोत असे अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाने म्हटले आहे. तर स्पेनच्या विदेश मंत्रालयाने देखील व्हेनेझुएलाकडून अटक करण्यात आलेल्या नागरिकांशी निगडित माहिती मागविली आहे.
निवडणुकीची पार्श्वभूमी
जुलै महिन्यात व्हेनेझुएलात झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीचा निकाल अमेरिका तसेच अन्य काही देशांनी नाकारला आहे. व्हेनेझुएलातील विरोधी पक्षाने देखील मादुरो यांच्यावर निवडणुकीत गैरप्रकार केल्याचा आरोप केला आहे. 28 जुलै रोजी व्हेनेझुएलात निवडणूक झाली होती. निवडणूकपूर्व सर्वेक्षणात विरोधी पक्षाचा उमदेवार एडमंड गोंजालेज हे विजयी होणार असल्याचे भाकित करण्यात आले होते. परंतु निवडणुकीत मादुरो हे विजयी झाले होते. मादुरो यांच्या विजयामुळे नाराज लोक रस्त्यांवर उतरले होते. निदर्शकांनी मादुरो यांचे बॅनर्स फाडले होते. मादुरो हे मागील 11 वर्षांपासून सत्तेवर आहेत.
अमेरिकेकडून निर्बंध
अमेरिकेसोबत व्हेनेझुएलाचे अनेक दशकांपासून मतभेद राहिले आहेत. व्हेनेझुएला कच्च्या तेलाचे साठे असलेला देश आहे. तरीही या देशातील 75 टक्क्यांपेक्षा अधिक लोकसंख्या दारिद्र्यारेषेखाली जगत आहे. अमेरिकेकडून या देशावर अत्यंत कठोर आर्थिक निर्बंध लादण्यात आले आहेत.