बांगलादेशातही ‘भारतविरोधी’ मोहिमेचा कट
विरोधी पक्ष बीएनपीकडून हालचाली : मालदीवच्या अध्यक्षांचे अनुकरण
वृत्तसंस्था/ ढाका
बांगलादेशातील सर्वात मोठा विरोधी पक्ष बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने (बीएनपी) मालदीवच्या धर्तीवर इंडिया आउट ऑपरेशन सुरू केले आहे. यापूर्वी मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी स्वत:च्या निवडणूक प्रचारात इंडिया आउट ऑपरेशनची सुरुवात केली होती. याच्या मदतीने मुइज्जू यांनी भारत समर्थक इब्राहिम सोलिह यांना पराभूत केले होते.
बीएनपी प्रमुख बेगम खालिदा झिया यांचे पुत्र तारिक रहमन यांनी इंडिया आउट ऑपरेशनची सुरुवात केली आहे. सध्यकाळात तारिक हे बीएनपीचे अंतरिम अध्यक्ष आहेत. बीएनपीकडून इंडिया आउट ऑपरेशन राबविण्यात येत असल्याने भारत सरकारला विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे. परंतु बांगलादेशात शेख हसिना यांचे सरकार असून त्या भारताबाबत अत्यंत सकारात्मक असल्याने बीएनपीच्या कारवायांना तेथे थारा मिळणार नसल्याचे मानले जात आहे.
बांगलादेश नॅशनल पार्टी ही देशातील सांप्रदायिक पक्ष आहे. अमेरिकेने या पक्षाला टियर-3 दहशतवादी संघटना घोषित केले आहे. बीएनपीचे कार्यकर्ते आता भारत हा बांगलादेशचा मित्र नाही, भारत बांगलादेशला उद्ध्वस्त करत आहे’ असा दुष्प्रचार करत आहेत. बीएनपीचे कार्यकर्ते सोशल मीडियावर भारतविरोधी घोषणा पोस्ट करत भावना भडकवू पाह आहेत. सोशल मीडियाच्या मदतीनेच ते भारताविरोधात नेपाळमध्येही वातावरण निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहेत.
संबंध बिघडविण्याचा प्रयत्न
भारत आमचा मित्र नाही, 1971 च्या युद्धादरम्यान भारत आमच्या मदतीसाठी आला नव्हता. भारताने बंगालींची मूल्यवान संपत्ती लुटण्याचे काम केल्याचा दुष्प्रचार करत बीएनपीचे कार्यकर्ते भारतावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करत आहेत. बीएनपीने स्वत:च्या शासनकाळात भारताच्या विरोधात भूमिका घेतली होती. तसेच भारतातील उग्रवादी गटांना थारा दिला होता. त्या काळात भारत आणि बांगलादेश यांचे संबंध तणावपूर्ण होते, परंतु शेख हसिना यांचे सरकार आल्यावर दोन्ही देशांचे संबंध सौहार्दपूर्ण झाले आहेत.