संघाच्या उपक्रमांवर बंदीबाबत विचार
सिद्धरामय्यांची प्रियांक खर्गेंच्या पत्रावर प्रतिक्रिया: सरकारच्या मुख्य सचिवांना आढावा घेण्याचे निर्देश
बेंगळूर : राज्यातील सरकारी जागांवर रा. स्व. संघाच्या उपक्रमांवर निर्बंध घालण्याबाबत आढावा घेण्याचे निर्देश राज्याच्या मुख्य सचिवांना दिले आहेत. तामिळनाडू राज्याने याबाबत घेतलेल्या भूमिकेचाही विचार केला जाईल, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त राज्यभरात संघ कार्यकर्त्यांकडून पथसंचलन व विविध उपक्रम राबविले जात आहेत. दरम्यान, ग्रामविकास मंत्री प्रियांक खर्गे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून सरकारी जागा व शाळांमध्ये रा. स्व. संघाच्या उपक्रमांवर बंदी घालण्याची विनंती केली आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. सोमवारी बागलकोट येथे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी प्रियांक खर्गे यांच्या पत्राविषयी प्रतिक्रिया दिली. रा. स्व. संघ उपक्रमांसाठी सरकारी जागांचा वापर करत आहे. तामिळनाडूत ज्याप्रमाणे निर्बंध घालण्यात आले आहेत, त्याचप्रमाणे राज्यातही बंदी घालावी, अशी विनंती करण्यात आली आहे, असे ते म्हणाले.
राज्य भाजपकडून टोला
मंत्री प्रियांक खर्गे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रावर राज्य भाजपने सोशल मीडिया ‘एक्स’वर प्रत्युत्तर दिले आहे. मंत्री प्रियांक खर्गे यांनी आधी स्वत:च्या कुटुंबाचा इतिहास जाणून घ्यावा, नंतर राष्ट्रसेवकांबद्दल भाष्य करावे अशी टिप्पणी केली आहे. तसेच काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी गृहमंत्री असताना बेंगळुरातील संघाच्या कार्यक्रमाला 2002 मध्ये भेट दिल्याचा फोटोही भाजपने साशल मीडियावर शेअर केला आहे. तुमचे वडील मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्वत: रा. स्व. संघाच्या कॅम्पला भेट दिली होती. संघाच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले होते आणि पूर्णपणे सहकार्यही केले होते, अशी खोचक टिप्पणी भाजपने प्रियांक खर्गेंना उद्देशून केली आहे.
भाजपकडून त्रिसदस्यीय समिती
राज्यात रा. स्व. संघाच्या उपक्रमांवर बंदी घालण्याबाबत मंत्री प्रियांक खर्गे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविल्याने सरकारच्या कार्यपद्धतीवर लक्ष ठेवण्यासाठी भाजपने समिती नियुक्त केली आहे. विधानपरिषद सदस्य एन. रवीकुमार, के. एन. नवीन यांच्यासह तिघांचा या समितीमध्ये समावेश आहे. ही समिती संघाविषयी सरकारची पुढील भूमिका काय असेल, यावर लक्ष ठेवणार आहे. एखाद्या वेळेस सरकारने प्रियांक खर्गेंच्या पत्राला सकारात्मक प्रतिसाद दिला तर पुढे होणाऱ्या परिणामांविषयी देखील ही समिती अध्ययन करेल.
प्रियांक खर्गेंकडून स्पष्टीकरण
रा. स्व. संघाच्या उपक्रमांवर निर्बंध घालण्यासंबंधी मंत्री प्रियांक खर्गे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविल्याने भाजप नेत्यांनी त्यांच्यावर चौफेर टीका केली आहे. त्यामुळे सोमवारी प्रियांक खर्गे यांनी बेंगळुरात पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले. मी संघावर बंदी घालावी असे सांगितलेले नाही. संघाचे उपक्रम सरकारी शाळा आणि सार्वजनिक ठिकाणी नकोत, एवढेच सांगितले आहे. रा. स्व. संघाची नोंदणी झाली असेल तर त्याची प्रत दाखवावी. संघाच्या कार्यालयावर राष्ट्रध्वज फडकण्यासाठी 55 वर्षे लागली, अशी टिप्पणीही खर्गे यांनी केली.