रेशनअंतर्गत डाळी, खाद्यतेल वितरणाचा विचार
मंत्री के. एच. मुनियप्पा यांची माहिती
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यातील बीपीएल रेशनकार्डधारकांना रेशनअंतर्गत डाळी आणि खाद्यतेल वितरण करण्याचा विचार सुरू आहे, अशी माहिती अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री के. एच. मुनियप्पा यांनी दिली. हुबळी येथे शनिवारी पत्रकारांशी ते बोलत होते. सध्या राज्य सरकार रेशन तांदळाबरोबरच ज्वारीचेही वितरण करत आहे. बीपीएल कार्डांची पडताळणी करणे गरजेचे आहे. केंद्र सरकारने मर्यादा घातली आहे. राज्यात 17 लाख अतिरिक्त रेशनकार्डांना धान्य वितरण केले जात आहे. त्यात वाढ करण्याची विनंती केंद्र सरकारकडे केली आहे, असे त्यांनी सांगितले.
ज्वारी खरेदी केल्यानंतर तीन महिन्यात खराब होत आहे. त्यामुळे ज्वारीसाठा उपलब्ध होताच त्याचे वितरण करण्याची सूचना दिली आहे. रेशनकार्डधारकांना तांदळाबरोबरच डाळी आणि खाद्यतेल देण्याचाही विचार सुरू आहे. रेशनअंतर्गत पुरविल्या जाणाऱ्या साहित्यांचा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.