For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘अरण्यसंरक्षक’ एसीएफ सुनीता निंबरगी

01:01 PM Sep 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
‘अरण्यसंरक्षक’ एसीएफ सुनीता निंबरगी
Advertisement

80 हजार हेक्टर वनजमिनीच्या संरक्षणाची जबाबदारी : 175 कर्मचाऱ्यांचे करताहेत नेतृत्व : वने सुरक्षित राहिली तरच मानवी समूह सुरक्षित

Advertisement

मनीषा सुभेदार, बेळगाव

‘या देवी सर्वभूतेषू,

Advertisement

शक्ती रुपेण संस्थिता’

‘नमस्तस्यै नमस्तस्यै 

नमस्तस्यै नमस्तस्यै 

नमो नम:’

शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ होत आहे. नवरात्र म्हणजे देवीचा उत्सव, देवी म्हणजे दुर्गा, महालक्ष्मी, कालिका, चंडिका, अंबाबाई...! तिची नावे व रूपे अनेक, पण उद्दिष्ट एकच ‘सर्वांच्या कल्याणाचे’, ‘सज्जनांच्या रक्षणाचे’, ‘दुष्टांच्या निर्दालनाचे!’ ती शक्तीचे, ऊर्जेचे स्रोत आहे. तिची हीच ऊर्जाशक्ती महिलांना प्रेरणा देते. या प्रेरणेतूनच त्या आज अनेक क्षेत्रांमध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवत आहेत, पुढील पिढ्यांसाठी प्रेरणा ठरत आहेत. अशाच विविध क्षेत्रांतील महिलांच्या कार्यकर्तृत्त्वाची नोंद घेणारे ‘नवदुर्गा’ हे सदर आजपासून सुरू करत आहोत.’ दशावतार’ गाजतो आहे... कांतारा गाजला... पुन्हा कांतारा-2 येतो आहे. यांच्या लोकप्रियतेचे कारण एकच, ते म्हणजे आपली जंगले, वने आणि नैसर्गिक संपदा सुरक्षित राखण्यासाठी या चित्रपटांनी हाताळलेला विषय होय.

निसर्गाला ओरबाडणे, प्राण्यांच्या अधिवासावर अतिक्रमण करून त्यांचा आसरा हिरावून घेणे हे प्रकार वाढतच चालले आहेत. परंतु, जंगल किंवा देवराई नष्ट झाल्या तर त्याचा काय विपरित परिणाम होणार आहे, हे स्पष्ट करण्यासाठी हे चित्रपट पुरेसे बोलके ठरले आहेत. वने सुरक्षित राहिली तरच मानवी समूह सुरक्षित राहील, हे खरेच. म्हणूनच अशा जंगलांची जबाबदारी एखादी स्त्राr घेते तेव्हा तिचे खरोखरच कौतुक करावेसे वाटते. सध्या वनखात्यामध्ये ‘असिस्टंट कन्झर्व्हेटर ऑफ फॉरेस्ट’ (एसीएफ) म्हणून खानापूर विभाग सांभाळणाऱ्या सुनीता निंबरगी या कौतुकास पात्र ठरतात. आज त्यांच्या कार्यकक्षेमध्ये 80 हजार हेक्टर वनजमीन असून त्याचे संरक्षण करण्याची महत्त्वाची जबाबदारी त्या पार पाडत आहेत. सहसा महिलांकडून न निवडल्या जाणाऱ्या या क्षेत्रामध्ये त्यांनी स्वत:चा असा ठसा उमटवला आहे.

सुनीता मूळच्या विजापूर जिल्ह्यातील बेनकनहळ्ळी गावच्या. मात्र, एमएपर्यंतचे त्यांचे शिक्षण बागलकोट येथे झाले. पाचही मुली असून पालकांनी त्याबद्दल कधीच खंत न बाळगता मुलींना अत्यंत मोकळ्या वातावरणात वाढवले. जेव्हा सातच्या आत घरात मुलींनी असावे, अशी अपेक्षा होती, अशा काळात त्यांच्या वडिलांनी आपल्या पाचही मुलींना क्रीडा क्षेत्रात मुक्त संचार करू दिला. त्यामुळेच स्वत: सुनीता या उत्तम खेळाडू असून उंच उडी आणि हर्डल्समध्ये त्यांनी राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी बजावली असून विद्यापीठातही विक्रम नोंदवला आहे. त्यांचे वडील शारीरिक शिक्षण शिक्षक होते. त्यामुळे ते जेव्हा बिळगी येथे काम करत होते, तेथे आपल्या मुलींना त्यांनी खेळासाठी प्रोत्साहन दिले. त्यामुळे या पाचही बहिणी जलतरण, सायकलिंग अशा विविध क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर चमकल्या.

वडिलांची बदली झाली तरी गावकऱ्यांना या मुलींचा अभिमान असल्याने त्यांनी या कुटुंबाला बाहेर जाऊ दिले नाही. दरम्यान, सुनीता यांना गणवेशाचे अतिशय आकर्षण असल्याने आपण पोलीस व्हावे, असे त्यांनी ठरविले. दरम्यान, अरण्य खात्यामध्ये जागा रिक्त असल्याचे त्यांना समजले. आपण मध्यमवर्गीय कुटुंबातील असून आम्हा पाच मुलींचे संगोपन व शिक्षण निभावताना वडिलांना किती कष्ट पडले, याची कल्पना असल्याने नोकरी माझ्यासाठी महत्त्वाची होती, असे सुनीता म्हणतात. सुदैवाने या खात्यामध्ये नोकरीसाठी त्यांची निवड झाली. परंतु, विरोधाभास असा की त्यांना जंगल, प्राण्यांचा अधिवास याबद्दल काहीच माहिती नव्हती. विजापूर जिल्हा हा तसा हिरवाईने कमी व रुक्ष असा कोरडा प्रदेश. त्यामुळे वनखात्यातील कामाच्या स्वरुपाबद्दल मला बिलकुल माहिती नव्हती. शिवाय पर्वतांच्या रक्षणासाठी मुलीला काय पाठवतोस? असे म्हणून अनेकांनी त्यांच्या वडिलांना हटकले. पण वडिलांनी त्यांना पूर्ण प्रोत्साहन दिल्याने त्यांचे पहिले पोस्टींग हल्याळ येथे झाले.

या ठिकाणी त्यांनी उत्तम कामगिरी बजावल्याने नजीकच्या तट्टीहळ्ळी येथील फॉरेस्ट इन्स्टिट्यूटमध्ये प्रशिक्षक म्हणून त्यांची नेमणूक झाली. त्यानंतर त्या बेळगावला आल्या. येथेही त्यांना सहकारी आणि जनतेचे प्रेम आणि पाठिंबा मिळाला. अलीकडेच खानापूरच्या एसीएफ म्हणून त्या रुजू झाल्या असून हे पद भूषविणाऱ्या त्या खानापूर विभागातील पहिल्या महिला आहेत. खानापूर म्हणजे पश्चिम घाट आलाच. एकूण 80 हजार हेक्टर वनजमीन त्यांच्या कार्यकक्षेत येते. त्याची सुरक्षितता हे त्यांच्यासमोरचे मोठे आव्हान आहे. जंगलतोड रोखणे हे आव्हान त्यांनी पेलले. त्यांच्या मते वनविभाग म्हणजे खुली तिजोरी आहे. परंतु, ती कोणी लुटू नये यासाठी डोळ्यात तेल घालून काम करावे लागते. रात्री-अपरात्री पाहणीसाठी बाहेर पडावे लागते. कणकुंबी विभागात तर अस्वलांची वसतीच आहे. त्यांच्या ब्रिडींग वेळेमध्ये जर कोणी समोर आले तर ते थेट हल्ला करतात. ते टाळण्यासाठी सुनीता दक्ष असतात.

आज त्यांच्या हाताखाली 175 जण काम करत आहेत. हे धाडस दाखवत असतानाच त्यांच्या मनाचा एक कोपरा पतीवियोगाच्या आठवणीने हळवा होत असतो. 2012 मध्ये त्यांचे पती गेले. त्यावेळी तिसऱ्या इयत्तेत असलेल्या मुलीला त्यांनी एलएलबीपर्यंत शिक्षण दिले. मी कधीही रात्री-अपरात्री आले तरी तिने कधीच तक्रार केली नाही, असे त्या अभिमानाने सांगतात. वनामध्ये कोणी शिकार करू नये, जंगलतोड करू नये यासाठी 24 तास दक्ष राहतानाच घरची आघाडी तितक्याच सक्षमपणे त्यांनी सांभाळली आहे. आजच्या तरुणींना काय सांगाल? या प्रश्नावर मी जेथे जेथे फिल्डवर जाते, तेथे मी स्त्राr आहे, याचा बाऊ न करता काम करते. स्त्राr म्हणून कोणत्याही सवलतीची अपेक्षा बाळगू नये. पालकांनी मुलींना इथे जाऊ नको, तिथे जाऊ नको असे बंधन न घालता त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात काम करू द्यावे. मात्र, मुलींनीसुद्धा जबाबदारीने वागून आपल्या पालकांचे नाव उज्ज्वल करावे, असे त्या म्हणाल्या.

‘मुख्यमंत्री गौरव’ पदकाने सन्मानित

आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग सांगताना बेळगाव शहरात आलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्नांची जी शर्थ केली ती विसरणे कधीच शक्य नाही, असे त्या म्हणतात. हुक्केरी येथे वनजमिनीवरचे अतिक्रमण मोठ्या धाडसाने त्यांनी थांबविले, याबद्दल त्यांना मुख्यमंत्री गौरव पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :

.