संवर्धन गडकिल्ल्यांचे...जतन इतिहासाच्या पाऊलखुणांचे
कराड / सुभाष देशमुखे :
‘इतिहास’ हा केवळ बोलण्यापुरता किंवा सोयीनुसार वापरण्यापुरता उरल्याची खंत समाजमन नेहमी व्यक्त करत असते. समाजमनातील अपवादात्मक लोकांच्या मनातील समाजभान जागृत होऊन ते इतिहासाचे संवर्धन अन् जतन करण्यासाठी वेळ काळ न पाहता घाम गाळण्यास पुढाकार घेतात. कराड शहरासह तालुक्याला ऐतिहासिक, प्राचीन वारसा आहे. त्याच्या पाऊलखुणा आज संवर्धनाअभावी झाडाझुडपात झाकून गेल्या आहेत. या पाऊलखुणा पुन्हा नव्या पिढीसमोर आणण्यासाठी ‘जतन स्वराज्याचे...संवर्धन गडकिल्ल्यांचे’ अशी हाक देत प्रशासकीय नियमांचे पालन करत पहिल्या टप्प्यात वसंतगड, भुषणगड किल्ल्यांचे संवर्धन व तिथे आढळलेल्या मुर्तींची प्रतिष्ठापना करण्याची धडपड सुरू केली आहे.
कराड तालुक्यात शिवकालिन पाऊलणखुणा असल्याचे अनेक पुरावे आढळले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा ज्यांच्यावर भरवसा होता ते पराक्रमी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची भुमी कराड तालुक्यातील तळबीड आहे. याच परिसरात वसंतगड हा गड आजही इतिहासाची साक्ष देत उभा असून या गडावर उत्तर बुरूज, समाधी, कृष्णा तलाव, पुर्व बुरूज, चोर गुफा, दक्षिण बुरूज, कोयना तलाव, गंगा तलाव, पश्चिम बुरूज आणि महत्त्वाचा नाईकबा दरवाजा आहे.
गडावर अजुनही बरेच काही
वसंतगड हा नव्या पिढीला आणि इतिहासाची जाणिव असलेल्या पर्यटकांना खुणावतो. अलिकडच्या काळात वसंतगडाला अस्ताव्यस्त वाढलेल्या झाडी, काटेरी झुडपांसह पडझडीने घेरले आहे. गडावर अजुनही ऐतिहासिक वास्तू, मुर्ती आहेत मात्र त्या काळाच्या ओघात आडोशाला गेल्या आहेत. त्यांचाही शोध सुरू आहे. यात एक मुर्ती आढळली आहे. ‘किल्ले वसंतगड’चे दिमाखदारपणा, भक्कमपणा कायम ठेवण्यासाठी ‘जतन स्वराज्याचे संवर्धन गडकिल्ल्यांचे’ अशी हाक देत प्रथम चव्हाण, निखिल लोहार, श्रवण मानकर, वैष्णवी पवार, आकांक्षा बुरसे, विवेक चाळके, विजय मुंढेकर, गीतांजली शिंदे यांच्यासह अनेक युवक युवतींनी वसंतगडासह भुषणगडाच्या नवसंवर्धनासाठी हात सरसावले आहेत. गेल्या तीन वर्षांपासून हे युवक युवती आपल्यापरीने जमेल तसेच गडांचे संवर्धन करून स्वच्छता राखणे, ट्रेकर्स, पर्यटक, शिवप्रेमींना गडाचे महत्त्व सहज कळावे म्हणून आवश्यक तिथे फलक लावण्याचा प्रयत्न करत होते. वास्तुदर्शक फलकांसह नकाशा लावण्यातही त्यांनी अहोरात्र धडपड केली.
आव्हानात्मक कार्याला सहकार्याचा ‘हात’
आता त्यांनी गडावरील ज्या इतिहासकालिन मुर्ती आहेत त्यांचे पावित्र्य जपण्यासाठी पुढाकार घेतला असून त्यासाठी त्यांच्या आव्हानात्मक कार्याला अनेकांनी सहकार्याचा हात पुढे केला आहे. तीन वर्षे युवक युवतींनी केलेल्या एक ना एक रूपयांचा हिशेब अन् त्यांचा गडकिल्ल्यांच्या संवर्धनाचा ध्यास पाहून समाजातून मदतीचा ओघ वाढण्यास सुरूवात झाली आहे. नव्या पिढीने हाती घेतलेल्या या चळवळीत कराड, मलकापूरसह तालुक्यातील अनेक गावातील शिवप्रेमींनी सहभाग घेतला आहे. यातूनच वसंतगड संवर्धनाची चळवळ भक्कम होण्यास सुरूवात होत आहे. कराडला ऐतिहासिक, प्राचीन, शिवप्रेमाचा वारसा आहे. सदाशिवगडावर ज्या पद्धतीने अनेक गडप्रेमींनी सीसीटीव्ही यंत्रणेसह गडावर येणाऱ्यांसाठी सोयीसुविधा उभारल्या आहेत त्याच पद्धतीने वसंतगडाचेही संवर्धन करण्याचा मानस या युवक युवतींचा आहे. कराडसह महाराष्ट्रातील शिवप्रेमींनी त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज व्यक्त होत आहे. अलिकडच्या काळात इतिहास हा सोयीप्रमाणे वापरला, बोलला जातो. इतिहासाच्या पाऊलखुणांचे जतन करण्यात अपवाद वगळता अनेक पर्यटक पाठ फिरवतात. उलट गडांवर पार्ट्या करणे, चाळे करणाऱ्यांमुळे गडांचे पावित्र्य भंग होण्याची खंत व्यक्त करणारांची संख्या कमी आहे. यावरही अंकुश ठेवण्याचे काम ‘जतन स्वराज्याचे...संवर्धन गडकिल्ल्यांचे’ हा ग्रुप करत आहे. या ग्रुपला समाजाकडून फक्त शाब्बासकीची थाप अन् पाठबळ मिळण्याची आवश्यकत आहे.
गडकिल्ले जपताय...लागेल ती मदत करू
वसंतगड, भूषणगड या किल्ल्यांचे संवर्धन करण्यात गुंतलेल्या युवक युवतींनी समाजातील अनेकांना आपली भुमिका पटवून सांगत प्रशासकीय अधिकाऱ्यांच्याही गाठीभेटी घेतल्या. कराड अर्बन बँकेतील डेव्हलपमेंट विभागाचे व्यवस्थापक व सामाजिक कार्यकर्ते संदीप पवार यांची या युवकांनी भेट घेतल्यानंतर त्यांनी तात्काळ सहकार्याचा हात पुढे करत तुमचे काम चांगले आहे. लागेल ती मदत करण्यास तयार असल्याची ग्वाही दिली. पोलीस अधिक्षक समीर शेख, पोलीस उपअधिक्षक अमोल ठाकूर यांच्यासह अन्य प्रशासकीय अधिकारी यांच्याशीही हे युवक युवती संपर्क साधून आपली भुमिका पटवून देत आहेत.