‘केडरबेस’ पक्ष बांधणीचे काँग्रेसचे धोरण
कोल्हापूर / कृष्णात चौगले :
राष्ट्रीय काँग्रेसच्या नवीन धोरणानुसार ‘केडरबेस’ पक्ष बांधणीकडे पक्षाचे नेते राहूल गांधी यांनी विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. यापूर्वी मी म्हणेल तो जिल्हाध्यक्ष असे राज्यातील अनेक जिह्यातील चित्र होते. पण आता जिल्हाध्यक्ष निवडीसाठी बाहेरील राज्यातील निरीक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यांच्याकडून त्या जिह्यात जाऊन स्थानिक माहिती घेतल्यानंतरच पक्षासाठी पूर्ण वेळ झोकून देऊन काम करणाऱ्या कार्यकर्त्याची जिल्हाध्यक्ष पदावर निवड केली जाणार आहे. जिह्यातील कोणी नेता म्हणतोय म्हणून नियुक्ती केली जाणार नाही. यामध्ये जिल्हाध्यक्षाकडे पक्षातील अनेक अधिकार बहाल केले जाणार आहेत, अशी माहिती काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी दिली.
आमदार सतेज पाटील यांचा वाढदिवस आज (12 एप्रिल) विविध उपक्रमांनी साजरा होत आहे. वाढदिवसाच्या पुर्वसंध्येला ‘तरूण भारत संवाद’ च्या प्रस्तुत प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवाद साधून काँग्रेस पक्षाची भविष्यातील वाटचाल आणि त्यांची राजकीय धोरणे याबाबत चर्चा केली.
- जिह्यात मजबूत संघटनात्मक बांधणी
यावेळी बोलताना आमदार पाटील म्हणाले, काँग्रेसच्या प्रदेशाध्यपदाची धुरा हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या संघटनात्मक बांधणीकडे विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. त्याचा आगामी कालावधीत पक्षाला निश्चित फायदा होईल. जिल्हा पातळीवर जिह्यात कॉंग्रेसची मजबूत संघटनात्मक बांधणी केली आहे. बूथ कमिट्यांपासून तालुका आणि जिल्हा पातळीपर्यंतच्या सर्व कार्यकारिणी सक्षम आहेत. या पक्षीय बांधणीचा आगामी सर्व निवडणूकांमध्ये फायदा होणार आहे.
- ग्रा.पं.च्या निवडणुका होत असतील तर जि.प. आणि पं.स.च्या का नाही ?
ओबीसी आरक्षणाबाबत न्यायालयाकडून अद्याप निर्णय झाला नसल्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत.ग्रामपंचायत ही स्थानिक स्वराज्य संस्थेचा पाया आहे. तरीही ओबीसी आरक्षणाच्या मुद्याशिवाय ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असतील तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुका का नाही ? या निवडणुका देखील होणे अपेक्षित आहे.
- छत्रपती शिवरायांच्या विचारधारेनुसारच काँग्रेसचे राजकारण
छत्रपती शिवाजी महाराजांनी बारा बलुतेदारांना सोबत घेऊन स्वराज्य निर्मिती केली. आठरा पगड जातीचे लोक त्यांच्या सैन्यदलात होते. याच विचारधारेवर काँग्रेसची वाटचाल सुरु असून सर्व जाती, धर्मांच्या लोकांना सोंबत घेऊन वाटचाल केली जाणार आहे. द्वेषाच्या राजकारणाला छेद देऊन समाजीक एकोपा निर्माण करण्याचा काँग्रेसचा नेहमी प्रयत्न राहिल. काँग्रेसपासून काहीअंशी दुरावलेल्या ओबीसी समाजाला पुन्हा जोडण्यासाठी ‘आऊटरीच प्रोग्रॅम’ राबविला जाणार असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.
- स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्ये पक्षीय राजकारण
सहकारी संस्थांच्या राजकारणामध्ये पक्षीय राजकारण केले जात नाही. तेथे प्रत्येक पक्षाची वेगवेगळी भूमिका असते. पण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये प्रत्येक पक्षामध्ये निवडणूक लढविण्यासाठी अनेक कार्यकर्ते इच्छूक असतात. त्यामुळे या निवडणुका पक्षीय पातळीवरच लढविल्या जातील, असे आमदार पाटील यांनी नमूद केले.
- राज्याच्या विकासात काँग्रेसचे मोठे योगदान
राज्याच्या विकासात गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसचे मोठे योगदान आहे. कृषी, औद्योगिक, विविध पाटबंधारे प्रकल्पासह आयटी सेक्टरच्या उभारणीपर्यंत काँग्रेसचे योगदान आहे. त्यामुळे सध्या राज्यात सध्या दिसत असलेल्या समृद्धीमध्ये काँग्रेसचा मोठा वाटा आहे. याची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आगामी काळात प्रयत्न करणार आहे. लोकांना रोजगार, सर्वसामान्यांसाठी आधारवड असलेल्या एसटीचे महामंडळ सक्षम करणे, शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासारखे अनेक हिताचे निर्णय काँग्रेसच घेऊ शकते याची जाणिवदेखील सर्वसामान्य जनतेला करून देणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.
- शक्तीपीठ, सोलरकृषीपंप विरोधात आंदोलनाची धार कायम ठेवणार
राज्यातील जनतेच्या मागणीशिवाय आणि कोणतीही गरज नसणारा शक्तीपीठ प्रकल्प बारा जिह्यातून जाणार आहे. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या सुपिक जमिनी महामार्गामध्ये जाणार आहेत. तसेच सौर कृषीपंपाचा निर्णय शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक असून पूरबाधित नदीपट्टयात हे पंप बसविल्यानंतर ते सुरक्षित राहणार नाहीत. त्यामुळे या निर्णयाला देखील काँग्रेसचा विरोध आहे.