For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

काँग्रेसही दाखविणार ‘राम’भक्ती

06:41 AM Feb 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
काँग्रेसही दाखविणार ‘राम’भक्ती

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्णय : मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी 100 कोटीचा निधी शक्य

Advertisement

वृत्तसंस्था/ बेंगळूर

कर्नाटकात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार देखील राज्यातील राम मंदिरांचा जीर्णोद्धार आणि विकासासाठी शासकीय खजिना खुला करण्यास तयार झाले आहे. राज्याच्या धर्मादाय विभागाकडून याकरता मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे निधीची मागणी करण्यात आली होती. मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे 16 फेब्रुवारी रोजी सादर करण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पात राज्यातील सुमारे 100 राम मंदिरांचा जीर्णोद्धार तसेच विकासासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करणार असल्याचे समजते.

Advertisement

अयोध्येतील भगवान रामाच्या पवित्र जन्मभूमीवर उभारण्यात आलेल्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापासून काँग्रेसने अंतर राखले होते, यानंतर काँग्रेसला हिंदूविरोधी ठरविण्याची संधी कर्नाटकात भाजपला मिळाली होती. कर्नाटकातील मंड्या येथे घडलेल्या हनुमान ध्वजासंबंधीच्या घटनेनंतर काँग्रेसवरील हिंदूविरोधी असल्याच्या आरोपांना धार मिळू लागली आहे. या पार्श्वभूमीवर डॅमेज कंट्रोल म्हणून तातडीने पावले उचलणे काँग्रेसला भाग पडले आहे. लवकरच होणारी लोकसभा निवडणूक पाहता अशाप्रकारची प्रतिमा निर्माण होणे परवडणारे नसल्याचे काँग्रेस ओळखून आहे.

Advertisement

दुसरीकडे भाजपने राज्यात काँग्रेसविरोधात जोरदार भूमिका घेतली आहे. तसेच भाजपने हजारो रामभक्त आणि भाविकांना अयोध्येत रामलल्लाचे दर्शन घडवून आणण्याची मोहीम सुरू केली आहे. राम मंदिर ट्रसटकडून राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी आणि लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांना देण्यात आले होते. परंतु या सर्व नेत्यांनी हे निमंत्रण नाकारले होते. मल्लिकार्जुन खर्गे हे मूळचे कर्नाटकचे असल्याने राज्य भाजपला लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसची कोंडी करण्याची मोठी संधी मिळाली आहे.

डॅमेज कंट्रोल सुरू

याचमुळे सिद्धरामय्या सरकारने राज्यातील 100 राम मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी उचललेली पावले आता पक्षाच्या डॅमेज कंट्रोलच्या योजनेचा हिस्सा असल्याचे सांगण्यात येत आहे. हिंदू धर्मासंबंधी राज्यातील काँग्रेसच्या काही नेत्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे लोकांमध्ये नाराजी निर्माण झाल्याचे मानण्यात येते.

लोकसभा निवडणुकीची पार्श्वभूमी

कर्नाटकात 28 लोकसभा मतदारसंघ आहेत, 2019 मध्ये भाजपने यातील 25 जागा जिंकल्या होत्या, तर एका मतदारसंघात भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवाराला विजय मिळाला होता. तर तेव्हा राज्यात सत्तेवर असलेल्या काँग्रेस आणि निजद आघाडीला केवळ 2 जागा जिंकता आल्या होत्या. यावेळी राजकीय समीकरणे बदललेली असली तरीही निजदसोबत आघाडी करत भाजप सर्व 28 जागा जिंकण्याचे उद्दिष्ट बाळगून आहे. तर दुसरीकडे प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर काँग्रेसने करविलेल्या एका सर्वेक्षणाच्या निष्कर्षामुळे राज्य सरकारला स्वत:ची भूमिका बदलावी लागल्याची चर्चा आहे.

Advertisement
Tags :
×

.