काँग्रेसला ‘370’ हवे, ‘पीओके’ नको !
हरियाणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खोचक टीका
वृत्तसंस्था / पलवल (हरियाणा)
महत्वाच्या आणि संवेदनशील राष्ट्रीय मुद्द्यांवर काँग्रेसची भूमिका दुतोंडी आहे. काँग्रेस पक्षाला काश्मीरमध्ये पुन्हा घटनेचा 370 वा अनुच्छेद आणायचा आहे, मात्र, त्यांना भारताचा पाकिस्तानने बेकायदेशीरपणे बळकावलेला पाकव्याप्त काश्मीरचा भाग मात्र नको आहे. काँग्रेस या संदर्भात काहीच बोलत नाही, अशी खोचक टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर मंगळवारी केली.
ते हरियाणातील पलवल येथे भारतीय जनता पक्षाच्या प्रचारसभेत भाषण करीत होते. त्यांनी अनेक मुद्द्यांवर काँग्रेसला धारेवर धरले. काँग्रेस सत्तेत असताना त्या पक्षाने कधीही किमान आधारभूत किमतीला कायद्याचे संरक्षण दिले नाही. पण आता मात्र, हा पक्ष ही मागणी करुन आपणच शेतकऱ्यांचे कैवारी असल्याचा डांगोरा पिटत आहे. काँग्रेसच्या सत्ताकाळात केवळ 3 ते 4 पिकांनाच किमान आधारभूत दराचा आधार देण्यात आला होता. भारतीय जनता पक्षाच्या सरकारने मात्र, विविध प्रकारच्या अनेक पिकांना किमान आधारभूत दराचा लाभ मिळवून दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले, असे प्रतिपादन त्यांनी केले.
प्रत्येक काम अर्धवट
काँग्रेसने आपल्या प्रदीर्घ सत्ताकाळात प्रत्येक काम अर्धवट सोडले. मोठ्या घोषणा करायच्या आणि सत्ता आली की जनतेकडे पाठ फिरवायची, हे काँग्रेसचे आजवरचे धोरण राहिले आहे. मात्र, आता जनता या धोरणाला फसणार नाही. देशासमोरचा प्रत्येक महत्वाचा मुद्दा काँग्रेसने अर्धवट सोडला आहे. काँग्रेसने अयोध्येत रामंमदीर होऊ दिले नाही. जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेसने कधीच भारताची राज्यघटना पूर्णत: लागू केली नाही. या पक्षाने महिलांना संसद आणि विधानसभांमधील आरक्षणापासून वंचित ठेवले. काँग्रेसने मुस्लीम महिलांना तोंडी तत्काळ तीन तलाकच्या संकटात कायम ठेवले. काँग्रेसने कधीही जनतेच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य दिले नाही, मात्र गांधी कुटुंबाचे आसन घट्ट करण्याचे ध्येय ठेवले, अशी टीका या भाषणात काँग्रेसवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
हरियाणाच्या जनतेला आवाहन
हरियाणातील ज्या लोकांचे या देशवर प्रेम आहे, त्यांनी आज देशासाठी एकत्रितरित्या आणि आपल्यातील सर्व भेद दूर करुन मतदान करण्याची आवश्यकता आहे. आपल्या अपत्यांच्या भविष्यासाठी आपण मतदान करायचे आहे, असा निर्धार हरियाणातील जनतेने करावा. भारतात नव्या नोकऱ्या निर्माण करण्यासाठी, देशात नवी गुंतवणूक आणण्यासाठी आणि देशाच्या प्रगतीतून हरियाणाची प्रगती साधण्यासाठी आपल्याला मतदान करायचे आहे, असा निर्धार या राज्यातील जनतेने करावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
मुख्यमंत्र्यांचेही भाषण
या सभेत हरियाणाचे मुख्यमंत्री नायाबसिंग सैनी यांनीही भाषण केले. गेल्या दहा वर्षांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या राज्यात मोठी प्रगती हरियाणाने साधली असून लोकांना आमचे कार्य माहीत आहे. त्यामुळे सलग तिसऱ्यांदा आम्हालाच जनता सरकार स्थापनेची संधी देईल. विजयाच्या आत्मविश्वासाने आम्ही या निवडणुकीत भाग घेत आहोत, असे प्रतिपादन त्यांनी भाषणात केले.
‘भरोसा दिलसे, भाजपा फिरसे’
हरियाणातील पलवल येथे सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या राज्यातील लोकांना ‘भरोसा फिरसे, भारतीय जनता पक्ष फिरसे’ अशी नवी घोषणा दिली. गेली सलग दहा वर्षे भारतीय जनता पक्षाच्या हाती या राज्याची सत्ता आहे. हा पक्ष आता सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. हरियाणाच्या गावागावांमधून भारतीय जनता पक्षाची लाट आहे, हे स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे तिसऱ्यांदाही आम्ही विजयी होवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.