For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगाव मतदारसंघात काँग्रेसचे डावपेच विफल

11:10 AM Jun 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
बेळगाव मतदारसंघात काँग्रेसचे डावपेच विफल
Advertisement

सौंदत्ती वगळता काँग्रेस सात मतदारसंघात पिछाडीवर : धक्कादायक निकालाबद्दल राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Advertisement

बेळगाव : बेळगाव लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांसह 13 जणांनी निवडणूक लढविली आहे. या मतदारसंघातील निवडणुकीचे निकाल धक्कादायक लागले आहेत. या निवडणुकीत 13 उमेदवारांचा सहभाग असला तरी भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत झाली. भाजप उमेदवार जगदीश शेट्टर यांनी पावणे दोन लाखाहून अधिक मताधिक्य घेऊन विजय संपादन केला आहे. तर महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे पुत्र काँग्रेस उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मतदारसंघातील या धक्कादायक निकालाबद्दल राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. इतर पक्षांसह अपक्ष उमेदवारांना अपेक्षित मते घेता आली नसल्याने राजकीय डावपेच विफल ठरल्याची चर्चा मतदारांमध्ये सुरू आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या बेळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपने आपले वर्चस्व दाखवून दिले आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दिवंगत खासदार सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी मंगला अंगडी विजयी झाल्या होत्या.

मात्र यानंतर मतदारसंघाला कोण वारसदार? असा प्रश्न भाजपसमोर निर्माण झाला होता. निवडणुकीपूर्वी भाजपच्या अनेक मातब्बर नेत्यांकडून तिकीट मिळविण्यासाठी चढाओढ सुरू होती. शेवटी बाहेरील उमेदवार माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांना उमेदवारी देण्यात आल्याने चर्चेला पूर्णविराम मिळाला होता. मात्र निवडणुकीमध्ये बाहेरील उमेदवाराला मतदारांचा प्रतिसाद मिळणार का? याबाबतही प्रश्न उपस्थित केला जात होता. काँग्रेसकडून हा मुद्दा हेरून जोरदार प्रचार करण्यात आला होता. त्यामुळे मतदारसंघातील निकालाबाबत राजकीय विश्लेषकांकडून वेगवेगळी मते व्यक्त करण्यात आली होती. आठ विधानसभा मतदारसंघ असणाऱ्या बेळगाव लोकसभा मतदारसंघात पाच विधानसभा मतदारसंघांवर काँग्रेस आमदारांचे वर्चस्व आहे.तर तीन मतदारसंघांवर भाजपच्या आमदारांची सत्ता आहे. यावरून काँग्रेसचे पारडे जड असल्याचे सांगण्यात येत होते. याबरोबरच काँग्रेस आमदारांचे वर्चस्व असणाऱ्या पाच मतदारसंघांतून काँग्रेस उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांना सौंदत्ती वगळता रामदुर्गमध्ये किरकोळ आघाडी मिळाली आहे. इतर कोणत्याच मतदारसंघातून मताधिक्य मिळाले नाही. त्यामुळे निवडणुकीतील हा धक्कादायक निकाल काँग्रेस उमेदवाराच्या पराभवाला कारण ठरल्याचे दिसून येत आहे.

Advertisement

मराठी भाषिक उमेदवाराला अत्यल्प प्रतिसाद...

बेळगाव ग्रामीण, दक्षिण व उत्तर या तीन मतदारसंघांमध्ये मराठी भाषिकांची संख्या अधिक असल्याने या मतदारांचा कौल महत्त्वाचा ठरणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात होते. मराठी भाषिक उमेदवाराला या मतदारसंघामधून अधिक मतदान मिळाल्यास राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांना सोयीचे ठरणार होते. मात्र हे गणित विफल झाले आहे. मराठी भाषिक उमेदवाराला अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याने राष्ट्रीय पक्षांकडून बांधण्यात आलेले राजकीय धोरण यावेळी अपयशी ठरले आहे. याचा फटका काँग्रेस पक्षाला बसला आहे. बेळगाव ग्रामीण, बेळगाव दक्षिण व उत्तर या तीन मतदारसंघात मराठी भाषिक मतदारांची मोठी संख्या असल्याने हे मतदार म. ए. समितीच्या पाठीशी राहतील, असे अंदाज बांधण्यात आले होते. या तीन मतदारसंघांतील मतदारांनी भाजपला साथ दिल्याने काँग्रेस उमेदवाराचे मताधिक्य मोठ्या प्रमाणात घटल्याचे दिसून आले.

Advertisement
Tags :

.