पणजी वीज कार्यालयाला काँग्रेसचा ‘धडक शॉक’
प्रस्तावित वीज दरवाढ मागे घेण्याची जोरदार मागणी : सामान्यांच्या प्रश्नांवरून वीज अधिकाऱ्यांना घातला घेराव
पणजी : राज्य सरकारतर्फे करण्यात आलेली वीज दरवाढ ही सामान्यांसाठी अन्यायकारक व आर्थिक भुर्दंड घालणारी आहे. त्यामुळे ही वीज दरवाढ सरकारने मागे घ्यावी, या मागणीसाठी काँग्रेस पक्षातर्फे काल सोमवारी वीज कार्यालयावर धडक मोर्चा नेण्यात आला. येत्या आठवडाभरात वीज दरवाढ मागे घेतली नाही, तर राज्यातील सर्व वीज कार्यालयांच्याबाहेर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दिला. प्रदेशाध्यक्ष पाटकर यांच्या अध्यक्षतेखाली आमदार कार्लोस फेरेरा, काँग्रेसचे उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हा समितीचे प्रमुख यांनी पणजीतील मुख्य वीज अभियंता स्टीफन फर्नांडिस यांना घेराव घातला.
वीज खात्यावर 570 कोटी ऊपयांच्या थकीत वीज बिलांचा बोजा आहे. त्यामधील 108 कोटी ऊपये हे सरकारचे स्वत:चे बिल थकीत आहे. ही बिले वसूल करण्याऐवजी वीजदरवाढीचा शॉक सामान्यांना का म्हणून दिला जात आहे, असा सवाल पाटकर यांनी वीज अभियंता स्टीफन फर्नांडिस यांना विचारला. वीज खात्याच्या इमारतीबाहेर पत्रकारांशी बोलताना पाटकर म्हणाले, वीज खात्याकडून लवकरच साडेसात लाख नवे मीटर बसविण्यात येणार आहेत. या मीटरची खरीच आवश्यकता आहे, का अशा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे ज्या कंपनीचे वीज मीटर बसविले जाणार आहेत, त्या मालकांचे सरकारशी काय हितसंबंध आहेत, हे तपासायला हवे, असेही पाटकर यांनी सांगितले.
औद्योगिक ग्राहकांसाठी वीज दरवाढ : फर्नांडिस
ही वीज दरवाढ केवळ औद्योगिक वसाहतीतील ग्राहकांना लागू आहे. घरगुती वीज वापरकर्त्यांना याचा फटका बसणार नाही. याबाबत सर्व माहिती वीजमंत्री सुदिन ढवळीकर देतील, असे मुख्य वीज अभियंता स्टीफन फर्नांडिस यांनी सांगितले.