जिल्हा बँकेवर काँग्रेसची सत्ता
30 वर्षांनंतर सत्तापालट : रायबागचे आप्पासाहेब कुलगोडे अध्यक्षपदी बिनविरोध
बेळगाव : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी रायबागचे आप्पासाहेब कुलगोडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. माजी खासदार रमेश कत्ती यांच्या राजीनाम्यानंतर बुधवारी अध्यक्षपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. बँकेत भाजपकडे पुरेसे संख्याबळ असूनही काँग्रेस पुरस्कृत संचालकाची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तब्बल 30 वर्षांनंतर मध्यवर्ती बँकेत काँग्रेसची सत्ता आली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी सकाळी पालकमंत्री सतीश जारकीहोळी, माजी मंत्री रमेश जारकीहोळी, माजी मंत्री भालचंद्र जारकीहोळी हे तिन्ही बंधू एकत्र आले होते. चर्चेअंती पालकमंत्र्यांनी आप्पासाहेब कुलगोडे यांचे नाव सुचविले. भाजप पुरस्कृत संचालकांनीही या नावाला सहमती व्यक्त केल्यामुळे अध्यक्षपदासाठी आप्पासाहेब यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांची अध्यक्षपदी निवड होणार तर सुभाष ढवळेश्वर उपाध्यक्षपदी कायम राहणार, अशी अटकळ होती. मात्र, ही अटकळ खोटी ठरली. भाजप पुरस्कृत संचालकांनीही या निर्णयाला होकार दिला. यावेळी पत्रकारांशी बोलताना माजी मंत्री भालचंद्र जारकीहोळी म्हणाले, पालकमंत्री सतीश जारकीहोळी, डॉ. प्रभाकर कोरे, रमेश जारकीहोळी, रमेश कत्ती, लक्ष्मण सवदी या सर्वांचे अभिप्राय घेऊनच अध्यक्षपदाची निवड जाहीर केली आहे. या निवडीनंतर संचालक आण्णासाहेब जोल्ले, रत्ना मामनी, महांतेश दोड्डगौडर आदींनी सुभाष ढवळेश्वर यांचे अभिनंदन केले.
सर्व संचालकांना विश्वासात घेऊन काम करू
यावेळी नूतन अध्यक्ष आप्पासाहेब कुलगोडे म्हणाले, गेली 19 वर्षे आपण जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आहोत. आता आपली अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. मध्यवर्ती बँकेत भाजप, काँग्रेस, निजद असा पक्षभेद नाही. जारकीहोळी बंधूंचे आपल्यावर प्रेम आहे. सर्व संचालकांना विश्वासात घेऊन काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
रमेश कत्ती गैरहजर
बुधवारी झालेल्या निवडणूक प्रक्रियेत माजी अध्यक्ष रमेश कत्ती यांनी भाग घेतला नाही, ते गैरहजर होते. मात्र बिनविरोध निवडीसाठी त्यांनी आपला होकार कळविल्याचे सांगण्यात आले.