काँग्रेसचे बंडखोर बाजीराव खाडे यांच्यावर पक्षाची कारवाई! ६ वर्षासाठी पक्षातून निलंबित
काँग्रेसचे बंडखोर उमेदवार बाजीराव खाडे यांच्यावर काँग्रेस पक्षाने कारवाई केली असून त्यांना पक्षातून ६ वर्षासाठी निलंबित केलं गेलं आहे. कोल्हापूर लोकसभेसाठी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक असलेले बाजीराव खाडे हे पक्षाचे राष्ट्रीय सचिव आहेत. यांनी सातत्याने पक्षाकडे कोल्हापूर लोकसभेसाठी आग्रह धरला होता. त्यानंतर त्यांनी नाइलाजाने बंड करून पक्षाविरोधात बंडखोरीची भुमिका घेतली आहे.
महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला असणारा कोल्हापूर मतदारसंघावर काँग्रेसनेही दावा सांगून तो आपल्याकडे खेचून आणला. कोल्हापूरचे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या नावाने काँग्रेसने महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्याविरोधात उमेदवार दिला.
तत्पुर्वी, काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव आणि प्रियंका गांधी यांचे निकटवर्तीय मानले जाणारे बाजीराव खाडे यांनीही कोल्हापूर लोकसभेसाठी इच्छुक असल्याचं जाहीर करून कोल्हापूरात अनेक ठिकाणा बॅनरही लावले होते. आणि काँग्रेसची तिकिट आपल्यालाच मिळणार असा विश्वासही व्यक्त केला होता. पण ऐनवेळी राजकिय घडामोडींना वेग येऊन शाहू महाराज छत्रपती यांच्या गळ्यात तिकीटाची माळ पडली.
दरम्यान, कोल्हापूर साठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या बाजीराव खाडे यांनी पक्षांकडून आपल्याला सामान्य कार्यकर्ता म्हणून अपेक्षा होती. पण ही आता स्वाभिमानाची लढाई झाली असल्याचे म्हटलं होतं. आपल्यावर अन्याय झाल्याचं सांगताना बाजीराव खाडे यांना रडू कोसळलं होतं. माघारीच्या दिवसाच्या दुसऱ्या दिवशी बाजीराव खाडे यांनी आपल्याला काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी विश्वासात न घेता कोल्हापूर लोकसभेचा निर्णय़ घेतला गेला. त्यानंतरही कोणत्याही प्रकारची विचारणा करण्यात आली नाही. त्यामुळे आता मी पुर्ण ताकतीने ही निवडणूक लढवणार असे जाहीर करून एक प्रकारे काँग्रेसच्या नेत्यांना आव्हानच दिले.
त्यानंतर काँग्रेस पक्षाकडून यावर कारवाई करत बाजीराव खाडे यांना पक्षातून निलंबित केलं. त्यांच्यावर ही कारवाई ६ वर्षासाठी करण्यात आली आहे.