अदानी प्रकरणावरून काँग्रेसची निदर्शने
पंतप्रधान मोदी आणि गौतम अदानींच्या मुखवट्यांचा वापर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान सोमवारी दोन्ही सभागृहात बराच गदारोळ झाला. याचदरम्यान, नेहमीप्रमाणे सोमवारीही काँग्रेस खासदारांनी गौतम अदानींच्या प्रकरणांबाबत संसदेच्या संकुलात निदर्शने केली. विरोधकांनी विरोध करण्याचा वेगळा मार्ग शोधला. विरोधी पक्षाचे नेते संसदेच्या संकुलात पंतप्रधान मोदी आणि गौतम अदानी यांचा मुखवटा (मास्क) घालून निषेध करताना निदर्शनास आले.
लोकसभेतील खासदार सुप्रिया भारद्वाज यांनी संसद संकुलात होत असलेल्या या निदर्शनाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये काँग्रेसचे सदस्य पंतप्रधान मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्या चेहऱ्यांची मास्क घालून हस्तांदोलन करताना दिसत आहेत. याचवेळी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे गौतम अदानींचा मुखवटा घातलेल्या काँग्रेस खासदाराच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना कॅमेऱ्याच्या दिशेने पुढे नेता दिसत आहेत.
विरोधी पक्षाच्या आंदोलनावेळी संसदेच्या आवारात जोरदार घोषणाबाजी झाली. मात्र, अदानी मुद्याबाबत आंदोलनात सहभागी झाले असले तरी समाजवादी पार्टी आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार त्यात सहभागी झाले नव्हते. काँग्रेस, द्रमुक, शिवसेना (युबीटी), राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) आणि इतर काही पक्षाच्या खासदारांनी संसद भवनाच्या गेटजवळ एकत्र येत पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात घोषणाबाजी केली. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे या आंदोलनात सहभागी झाले होते. विरोधकांनी ‘मोदी-अदानी एक है’ आणि ‘आम्हाला न्याय हवा’ अशा आशयाच्या घोषणा दिल्या.