काँग्रेसच्या आढावा बैठकीत गोंधळ; पक्ष बदल, मानपानावरुन पदाधिकाऱ्यांमध्ये जुंपली
शहराध्यक्ष असताना मला बैठकीचे निमंत्रण नाही असा आरोप माजी नगरसेवक संजय मेढे यांनी केला
मिरज : शहरात आयोजित कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत मंगळवारी मानपान आणि संघटनात्मक बदलावरुन पदाधिकाऱ्यांच्या फोन गटात जोरदार खडाजंगी झाली. शहराध्यक्ष असताना मला बैठकीचे निमंत्रण नाही असा आरोप माजी नगरसेवक संजय मेढे यांनी केला. तर लोकसभा निवडणुकीत सांगलीत तुम्ही अपक्ष उमेदवाराचा प्रचार करीत होता. असा आरोप दुसऱ्या पदाधिकाऱ्यांच्या गटाकडून करण्यात आल्याने संजय मेढे आक्रमक झाले. सांगली जिल्हा पक्ष निरीक्षक रामहरी रुपनर यांच्या समोरच पदाधिकाऱ्यांच्या दोन गटात हमरीतुमरी झाली. बापागापीतच ही बैठक पार पडली.
कॉग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्याचे निरीक्षक रामहरी रूपनर, प्रदेशचे पदाधिकारी आदित्य पाटील आणि शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या उपस्थित पदाधिकाऱ्यांची आढवा बैठक आयोजित केली होती. नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी आणि संघटनात्मक बदलाच्या पार्श्वभूमीवर बैठकीचे आयोजन करण्यात आते होते.
मात्र मिरज शहराध्यक्ष आणि माजी नगरसेवक संजय मेढे यांना या बैठकीचा निरोप मिळाला नाही असा आरोप करत संजय मेंढे यांनी जाब विचारण्यास सुरुवात केल्यानंतर जोरदार वादावादीला सुरुवात झाली. मिरज येथे कॉंंग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीतील पदाधिकाऱ्यांनी गोंधळाला सुरुवात केल्यानंतर जोरदार बाचाबाचीता झाली.
पक्षाचा शहर अध्यक्ष असताना सुद्धा तुम्ही सांगलीतील अपक्ष उमेदवाराच्या प्रचारात कसे होता? असा सवाल दुसऱ्या पदाधिकाऱ्यांच्या गटाने संजय मेढे यांना विचारला. त्यानंतर दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोपींच्या फैरी सुरू झाल्या. उपस्थित असणाऱ्या अन्य पदाधिकाऱ्यांनी वादावादी करणाऱ्यांना शांत करत वादावर पडदा टाकला. मिरज शहर अध्यक्ष संजय मेंढे यांना निरोप न दिल्यामुळे वाद निर्माण झाला की पदाधिकारी बदलाच्या पार्श्वभूमीवर हा वाद निर्माण झाला अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर मिरज मतदार संघात कॉंग्रेस पक्षाची वाताहत झाली असताना पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठक गोंधळात झाल्याने अशाने पक्ष वाढणार का? असा सवाल राजकीय तज्ज्ञांकडून विचारला जात आहे.