काँग्रेसचा हरियाणावर विनामूल्य आश्वासनांचा अक्षरश: पाऊस
विधानसभेसाठीच्या जाहीरनाम्यात विनामूल्य आश्वासनांचा अक्षरश: पाऊस
वृत्तसंस्था / चंदीगढ
हरियाणात विधानसभा निवडणूक आता तोंडावर आली असून काँग्रेसने या राज्यातील मतदारांवर विनामूल्य आश्वासनांचा अक्षरश: पाऊस पाडला आहे. या राज्यात बहुमत मिळाल्यास सात हमींची पूर्तता केली जाईल, असे आश्वासन काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि इतर नेत्यांनी बुधवारी येथे दिले.
राज्यातील 18 ते 60 वर्षे वयोगटातील सर्व महिलांना प्रतिमहिना 2 हजार रुपयांचे मानधन, सर्व ज्येष्ठ नागरिकांना प्रतिमहिना 6 हजार रुपयांचे मानधन, प्रत्येक घराला 300 युनिटस् पर्यंत वीज विनामूल्य, 500 रुपयांमध्ये स्वयंपाकाच्या गॅसचा सिलिंडर, गरिबांना विनामूल्य घरे, सर्व नागरिकांना 25 लाख रुपयांपर्यंतचे वैद्यकीय उपचार विनामूल्य, शेतकऱ्यांच्या शेतमालाला किमान आधारभूत दराची कायदेशीर हमी, बेरोजगारांना नोकरी, आरक्षणाचे क्रिमीलेअर वार्षिक 6 लाख रुपयांवरून 10 लाख रुपयांपर्यंत वाढविणार, कुटुंब कल्याण योजनेचे क्रियान्वयन अशी अनेक आश्वासने काँग्रेसने दिली आहेत. ‘सत वादे, पक्के इरादे’ अशी घोषणाही या निवडणुकीसाठी काँग्रेसने तयार केली आहे.
5 ऑक्टोबरला मतदान
हरियाणात विधानसभेच्या 90 जागा असून सर्व जागांसाठी येत्या 5 ऑक्टोबरला मतदान होत आहे. 8 ऑक्टोबरला मतगणना होणार आहे. हरियाणा विधानसभा नुकतीच विसर्जित करण्यात आली असून विद्यमान मुख्यमंत्री नायबसिंग सैनी हे हंगामी मुख्यमंत्री म्हणून काम पहात आहेत. गेली दहा वर्षे राज्यात भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री असून यंदा हा पक्ष हॅटट्रिक करणार की त्याच्या हातून सत्ता जाणार, हे 8 ऑक्टोबरलाच स्पष्ट होणार आहे.
आम आदमी पक्षाशी स्पर्धा
विनामूल्य आश्वासने देण्याच्या संदर्भात काँग्रेसने आम आदमी पक्षाशी स्पर्धा चालविली आहे, असे दिसून येत आहे. राज्यात काँग्रेसची आम आदमी पक्षाशी युती होईल अशी शक्यता व्यक्त होत होती. तथापि अशी युती होणार नाही, असे सध्याचे वातावरण आहे. काँग्रेसने 89 जागांवर आपले उमेदवार घोषित केले असून 1 जागा समाजवादी पक्षाला सोडली आहे. तर भारतीय जनता पक्षाने सर्व 90 जागांवर उमेदवारांची घोषणा केली आहे. याशिवाय जननायक जनता पक्ष, भारतीय राष्ट्रीय लोकदल इत्यादी प्रादेशिक पक्षही या निवडणुकीत भाग घेत आहेत. बहुजन समाज पक्षाने भारतीय राष्ट्रीय लोकदलाशी युती करुन ही निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. तर चंद्रशेखर आझाद यांच्या पक्षाने जेजेपीशी युती केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदानासाठी सर्व सज्जता केली असून सुरक्षा व्यवस्थाही कडेकोट ठेवण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.