काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक 9 रोजी बेळगावात
बेंगळूर : बेळगावमध्ये 8 डिसेंबरपासून राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाला प्रारंभ होणार आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवार 9 डिसेंबर रोजी सायंकाळी बेळगावमधील एका हॉटेलमध्ये काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतत्त्वाखाली ही बैठक होणार आहे. सोमवार दि. 8 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यामुळे अधिवेशन काळात विधानसभा व विधानपरिषदेत विरोधी पक्षांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी सत्ताधारी काँग्रेसकडून रणनीती आखली जात आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवार 9 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता बेळगावमधील एका खासगी हॉटेलमध्ये काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली आहे.
अलिकडेच अधिकार हस्तांतरावरून गटबाजीचे राजकारण झाल्यामुळे काँग्रेसमधील आमदार विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत अधिक स्पष्टीकरण मिळविण्याची शक्यता आहे. अधिकार हस्तांतराच्या मुद्द्यावरून गोंधळ निर्माण झाल्यानंतर होणारी विधिमंडळ पक्षाची ही पहिलीच बैठक आहे. अधिवेशनाच्या निमित्ताने ही बैठक होणार असली तरी प्रामुख्याने अधिकार हस्तांतराच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री सिद्धरामय्या महत्त्वाची चर्चा करण्याची शक्यता आहे. राज्य काँग्रेसमधील मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीचा संघर्ष शिगेला पोहोचलेला असतानाच पक्षश्रेष्ठींच्या सूचनेवरून मुख्यमंत्री सिद्धरामय्या व उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी परप्पर चर्चेद्वारे गोंधळ मिटविला होता. या दोन्ही नेत्यांच्या गटातील आमदार विधिमंडळाच्या बैठकीत कोणती भूमिका घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.