For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चिकोडीत काँग्रेसची प्रचारात आघाडी

11:32 AM Apr 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
चिकोडीत काँग्रेसची प्रचारात आघाडी
Advertisement

बुथनिहाय कार्यकर्त्यांच्या बैठका : जनसंपर्कावर भर

Advertisement

बेळगाव : लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाची तारीख जवळ येत आहे, त्याप्रमाणे प्रचाराच्या तोफाही जोराने धडाडू लागल्या आहेत. बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी लोकसभा मतदारसंघात दोन राजकीय प्रबळ कुटुंबांमधील लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. विद्यमान खासदार अण्णासाहेब जोल्ले पुन्हा एकदा निवडून येण्यासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. यावेळी जिल्ह्यातील प्रभावी राजकारणी जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या कन्या काँग्रेस उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांनी जोल्लेंसमोर आव्हान उभे केले आहे. भाजपकडे असणाऱ्या या मतदारसंघावर ताबा मिळविण्यासाठी काँग्रेसकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. मतदारसंघ आपल्याकडेच राखण्यासाठी भाजपकडूनही तितक्याच ताकदीने प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधानसभा मतदारसंघानुसार नेत्यांच्या बैठका घेतल्या जात आहेत. बुथ पातळीवर पक्षाला अधिक भक्कम करण्यासाठी दोन्ही पक्षांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

यामध्ये काँग्रेस पक्ष आघाडीवर असून मंत्री सतीश जारकीहोळी यांनी आपल्या राजकीय अनुभवाच्या जोरावर मतदारसंघ पिंजून काढला आहे. दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराला वेग देण्यात आला आहे. मतदारांच्या गाठीभेटी घेण्यात काँग्रेस पक्षाने आघाडी साधली आहे. भाजपकडून अद्यापही संपूर्ण मतदारसंघात मतदारांच्या गाठीभेटी घेण्यात तितकासा प्रभाव दाखविला गेला नाही. त्यामुळे मतदारांमध्ये उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. विद्यमान खासदार अण्णासाहेब जोल्ले यांना प्रचारामध्ये आघाडी मिळविण्यासाठी खडतर परिश्रम घ्यावे लागत आहेत. या उलट काँग्रेसकडून गावोगावी मतदारांच्या गाठीभेटी घेऊन थेट संपर्क साधण्यात आघाडी घेतली आहे. अनेक भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. ही काँग्रेसच्या उमेदवारासाठी जमेची बाजू ठरत आहे. त्यामुळे मतदारसंघात काँग्रेस वरचढ असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

Advertisement

“चिकोडी लोकसभा काँग्रेस उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांच्या विजयासाठी खडतर परिश्रम घेण्यात येत आहेत. निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर प्रचाराला वेग देऊन मतदारांच्या गाठीभेटी घेण्यात आल्या आहेत.”

- मल्लिकार्जुन काशिंगे (केपीसीसी प्रचार समिती, जिल्हाध्यक्ष)

“जवळपास तीन दशकांपेक्षा अधिक काळापासून जारकीहोळी कुटुंबीय समाजसेवेमध्ये सक्रिय आहे. प्रभावी राजकारणी मास्टरमाईंड म्हणून ओळखले जाणारे मंत्री सतीश जारकीहोळी यांची कन्या प्रियांका जारकीहोळी यांचा विजय निश्चित आहे.”

- मौनेश पोतदार, काँग्रेस युवा नेते

Advertisement
Tags :

.