NCP Ajit Pawar : पुन्हा एकदा राजकारणाचा डाव, काय असेल जयश्रीताई पाटील यांची पुढची खेळी?
भविष्यात वहिनींनी कोणता निर्णय घ्यायचा याबाबत विचारविनिमय होणार
सांगली : काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार आणि कै. माजी मंत्री मदनभाऊ पाटील यांच्या पत्नी श्रीमती जयश्रीताई पाटील यांनी पुन्हा एकदा राजकारणाचा डाव आखण्यास प्रारंभ केला आहे. मदनभाऊ प्रेमी कार्यकर्त्यांची बुधवारी सायंकाळी चार वाजता कळंबी येथील फार्महाऊसवर बैठक घेण्यात आली आहे.
या बैठकीत भविष्यात वहिनींनी कोणता निर्णय घ्यायचा याबाबत विचारविनिमय होणार आहे. पण अनेक कार्यकर्ते हे राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षात जयश्री वहिनीनी जावे असा आग्रह धरत आहेत. त्यामुळे बुधवारी होणाऱ्या बैठकीकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.
जिल्ह्यातील राजकारणावर गेल्या 40-45 वर्षापासून विष्णुआण्णा गट कार्यरत आहे. या गटाचे नेत्तृत्व स्वत: माजी आमदार कै. विष्णुआण्णा पाटील यांनी केले. त्यानंतर नेत्तृत्त्व त्यांचे चिरंजीव माजीमंत्री मदन पाटील यांच्याकडे आले आणि आता नेत्तृत्व श्रीमती जयश्रीवहिनी यांच्याकडे आले आहे.
या गटावर काँग्रेस आणि राष्ट़वादी या दोन्ही पक्षाने अन्याय केला आहे. पण या दोन्ही पक्षांना या गटाने स्थानिक पातळीवर सत्तेच्या चाव्याही मिळवून दिल्या आहेत. त्यामुळे या गटाचे नेत्तृत्व हे सत्तेत असो अथवा विरोधात त्यांची हवा सांगलीत असतेच. याचे कारण म्हणजे या गटाच्या कार्यकर्त्यांची असलेली मजबूत फळी होय.
जिल्ह्यात कितीही दुसऱ्या पक्षाची हवा असू दे या गटाचा कार्यकर्ता हा नेता म्हणेल तसाच वागतो. या गटाने 2024 साली श्रीमती जयश्री वहिनीना आमदार करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी काँग्रेसकडून अधिकृतरित्या तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न केला. पण तिकिट नाकारल्यानंतर त्यांनी काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्याविरूद्ध बंडखोरी केली. त्यांना 30 हजारापेक्षा अधिक मते मिळाली.
काँग्रेसकडून सहा वर्षासाठी निलंबित
काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराविरूद्ध बंडखोरी केल्यामुळे श्रीमती जयश्रीवहिनींना काही महिन्यापुर्वीच काँग्रेसमधून सहा वर्षासाठी निलंबित केले आहे. त्यामुळे त्या शांतच होत्या. पण काही दिवसापूर्वी त्यांना राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे भेटून गेले होते. तसेच अजितदादा पक्षाचे नेतेही त्यांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे त्यांनी पुन्हा राजकारणात डाव टाकण्याची तयारी केली आहे.
जयश्री वहिनी अजितदादा राष्ट्रवादी पक्षात जाण्याच्या मानसिकतेत
दरम्यान, मदनभाऊ प्रेमी अनेक कार्यकर्त्यांनी श्रीमती जयश्री वहिनीनी आता आपण सत्तेत जावू असा सल्ला दिला आहे. त्यामुळे त्यांची मानसिकता अजितदादा राष्द्रवादी पक्षात जाण्याची आहे. बुधवारी होणाऱ्या बैठकीत यावर बऱ्यापैकी निर्णय होईल असे कार्यकर्त्यांनी सांगितले.