काँग्रेसला भाजपची धास्ती
भाजपच्यानंतरच जाहीर करणार उमेदवार
पणजी : पक्षातून फुटलेल्या आमदारांना, उमेदवारांना पक्षात फेरप्रवेश नाही अशी ठाम भूमिका काँग्रेसने घेतली असून त्यात कोणताही बदल होणार नाही, असे गोवा प्रदेश अध्यक्ष अमित पाटकर यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर काँग्रेस उमेदवारांची घोषणा करणार असल्याचे पाटकर यांनी सांगितले.
जि. पं. साठी आधी उमेदवार जाहीर केल्यास त्यांना भाजप लक्ष्य करण्याची शक्यता आहे किंवा त्यांना फोडून नेण्याचाही संभव आहे. ते भाजपला बळी पडू नयेत, म्हणून काँग्रेस पक्ष नंतरच उमेदवार जाहीर करणार असल्याचे त्यांनी नमूद केले. निवडणूक वेळापत्रक व त्याची अधिसूचना अजून आलेली नाही. त्याची प्रतिक्षा काँग्रेस पक्षाला आहे. आमचे उमेदवार निश्चित झाले असून ते काम करीत आहेत, असेही पाटकर म्हणाले.
काही वर्षांपूर्वी काँग्रेसमधून फुटलेले आमदार इजिदोर फर्नांडिस हे गोवा फॉरवर्ड पक्षात प्रवेशकर्ते झाले आहेत. त्याबाबत विचारणा केल्यानंतर पाटकर यांनी वरील प्रतिक्रिया दिली आहे. ते पुढे म्हणाले, इतर कोणताही पक्ष त्यांना प्रवेश देत असेल तर त्याबाबत आपण काही बोलू शकत नाही. त्या पक्षातर्फे आपण उत्तर देणार नाही. जि. पं. निवडणुकीत युतीबाबत चर्चा चालू असून पुढील निर्णय करण्यात येणार आहे, अशी माहिती पाटकर यांनी दिली.