कर्नाटकात काँग्रेसचे सरकार असल्याने मराठी माणसांच्या कुरापती काढतेय
आमदार महेश शिंदे यांची स्पष्टोक्ती,
शरद पवार यांच्यावरही टीका
सातारा
कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आहे त्यामुळे ते महाराष्ट्र आणि सिमा भागातल्या मराठी लोकांच्या कुरापती काढत आहेत. आम्हाला आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिले तर आम्ही बेळगावला जावू, कर्नाटक सरकारला शिवसेना काय आहे ते दाखवून देवू, अशा शब्दात त्यांनी कर्नाटक सरकारला पत्रकारांशी बोलताना इशारा दिला आहे. दरम्यान, ईव्हीएम मशिनवरुन शरद पवार यांच्यावर त्यांनी निशाणा साधला.
आ. महेश शिंदे मुंबईत विधीमंडळ अधिवेशनाच्या काळात पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, मंत्रीमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा पवार हे तिघे बसून कोणाला मंत्री करायचे, कोणते खाते द्यायचे याचा निर्णय घेणार आहेत. निश्चित जे लोक प्रामाणिक काम करताहेत. जनतेत जातात त्यांना संधी देतील असे मला वाटत आहे. आणि जे काय होईल ते खूप चांगले होईल. मागच्या 22 महिन्यात महाराष्ट्राच्या जनतेचं भलं केले. त्याच्यातून आता एवढे मोठे यश मिळाले आहे. तरुणांना ते संधी देतील असे मला वाटते, असे त्यांनी सांगितले. पुढे ईव्हीएमवरुन शरद पवार यांनी आंदोलन उभे केले आहे, त्यावर तुमचे मत काय असा प्रश्न छेडला असता ते म्हणाले, घटना बदलायचा अनुभव शरद पवार साहेबांना फार मोठा आहे. तुम्हाला माहिती आहे. शरद पवार साहेबांएवढे अनुभवी महाराष्ट्रात कोणच नेते नाहीत. त्यांनी पहिली घटना बदलली ती रयत शिक्षण संस्थेची. त्यांनी सगळी संस्था कुटुंबाच्या घशात घातली. लेकीच्या नावाने केली. आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांना त्यांच्या लेकीला करायचे आहे का?, तेही लोकशाहीला डावलून असे मला वाटायला लागले आहे. लोकशाहीतल्या जनतेन आज आम्हाला निवडून दिले. आमच्या माता भगिनीनी आम्हाला निवडून दिले. लाडक्या बहिणींनी आम्हाला निवडून दिले आहे. हे त्रिवार सत्य समोर असताना विनाकारण नको त्या गोष्टी काढल्या जातात. पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्याने घटना बदलून रयत शिक्षण संस्थाच लेकीच्या नावाने करुन टाकली. आता का महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद सुद्धा लेकीच्या नावाने करुन टाकणार का, जनमत कुणाला दिले बघा की. मला तर वाटते की आज त्यांनी स्वत:च्या वागण्यात बदल केला पाहिजे. जनतेने दिलेल्या कौलामुळे ते किमान सुधारतील तरी माझी चूक झाली म्हणतील, चव्हाण साहेबांच्या विचारांशी प्रतारणा झाली म्हणतील, गोरगरीब जनतेची कर्मवीर भाऊराव पाटलांनी उभी केलेली रयत शिक्षण संस्थेत मी दरवर्षी 100 ते सव्वाशे कोटी लेकीच्या नावाने नेले असे म्हणतील, 1200 कोटीचा दरवर्षी भ्रष्टाचार केला असे म्हणतील, हे ते सगळे स्वीकारतील पण ते राहिले बाजूला आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या मागे लागलेत. किमान लेकीने तरी वडिलांना सांभाळले पाहिजे, अशा शब्दात त्यांनी जोरदार शरद पवार यांच्यावर टीका करत ते म्हणाले, आमचा पाठपुरावा सुरु आहे. निश्चितच याचा आऊट कम चांगला निघणार आहे. राज्याचे गाढा सुरु झालेला आहे. गोरगरिबांसाठी आमच्या पुर्वजांनी संस्था उभ्या केल्या. त्या परत मिळवणे हे आमचे कर्तव्य आम्ही पार पडणार, असे त्यांनी स्पष्ट केले.
कर्नाटक सरकारलाही ठणकावले
महाराष्ट्र एकीकरण समिती मेळावे घेत आहेत, बेळगाव प्रश्नी तुमची काय भूमिका असेल असे पत्रकारांनी विचारल्यावर आमदार महेश शिंदे म्हणाले, एकनाथ शिंदे साहेबांची बेळगाव बाबतची भूमिका पूर्वी होती तीच आहे. शिवसेना मराठी माणसांच्या पाठीमागे ठाम आहे. साहेबांनी सांगितले तर आम्ही बेळगाव जावू, कर्नाटकात काँग्रेसचे सरकार असल्याने कुरापती काढण्याचे काम सुरु आहे, असेही त्यांनी सांगितले.