काँग्रेसला पैशाच्या चणचणीचा त्रास
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्र सरकारच्या ‘कर दहशतवादा’मुळे काँग्रेसला ऐन निवडणुकीच्या काळात पैशाची चणचण त्रास देत आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी केला आहे. केंद्र सरकारने काँग्रेसची बँक खाती गोठविली आहेत. तसेच प्राप्तीकराची रक्कम परस्पर वसूल केली आहे. परिणामी, पैशाशिवाय निवडणूक कशी लढायची ही समस्या निर्माण झाली असल्याचा दावा रमेश यांनी केला.
आमच्या बँक खात्यांवर भारतीय जनता पक्षाच्या सरकारने ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला आहे. त्यामुळे पैशाचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. भारतीय जनता पक्षाने अशा प्रकारे राजकारण करुन विरोधकांची कोंडी करण्याचा प्रयत्न चालविला आहे. तरीही आम्ही लोकसभा निवडणुकीसाठी तयार आहोत, असेही प्रतिपादन त्यांनी केले. केंद्र सरकारच्या निवडणूक रोखे योजनेवर त्यांनी टीका केली. या योजनेतून काँग्रेसलाही जवळपास दीड हजार कोटी रुपयांची रक्कम मिळाली आहे. मात्र, या रकमेसाठी आम्ही कंत्राटे दिलेली नाहीत, असा दावा त्यांनी केला.
भाजपचे प्रत्युत्तर
रोख्यांमधून मोठी रक्कम मिळविल्याचा आरोप काँग्रेसने भारतीय जनता पक्षावर केला आहे. तथापि, काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या आघाडीतील अनेक पक्षांना हजारो कोटी रुपयांच्या रकमा याच योजनेतून मिळालेल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस किंवा इतर विरोधी पक्ष यांना भारतीय जनता पक्षावर तोंडसुख घेण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. या निवडणूक रोखे व्यवस्थेतून मिळालेल्या साधारणत: 12 हजार कोटी रकमेपैकी निम्मी रक्कम विरोधी पक्षांनाही मिळाली आहे, असे प्रत्युत्तर काँग्रेसच्या टीकेला भारतीय जनता पक्षाकडून देण्यात आले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकतीच ही माहिती आपल्या वेबसाईटवर घोषित केलेली आहे.