अखेर आरजी, गोवा फॉरवर्डकडे युती करण्याचा काँग्रेसचा निर्णय
प्रत्येकी दहा जागा सोडणार : स्वत: लढणार तीस जागा
पणजी : राज्यात होऊ घातलेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीत मुख्य विरोधी पक्ष काँग्रेसने आरजीपी आणि गोवा फॉरवर्ड या दोन्ही पक्षांकडे युती करण्याचे ठरविले असून दोन्ही पक्षांना प्रत्येकी दहा जागा देण्यावर विचार चालविला आहे. काँग्रेस पक्ष 30 जागांवर निवडणूक लढविणार आहे. आरजीपी आणि गोवा फॉरवर्ड यांनी मागितलेल्या काही जागांवर काँग्रेस नेत्यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. येथील काँग्रेस भवनात बुधवारी सायंकाळी बराच गोंधळ निर्माण झाला. शिवोली आणि सांताक्रुज या मतदारसंघाच्या जागांवर आरजी पक्षाने दावा केला आहे. या जागा देण्यास काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार आक्षेप घेतला. पक्षाचे एक नेते राजन घाटे यांनी काही प्रश्न प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांना केले. त्यांच्या समर्थनार्थ काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे बराच वेळ वातावरण तापले होते. पाटकर यांनी अद्याप कोणताही निर्णय झालेला नसल्याचे सांगितले आणि कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.
आरजी नको, तुकाराम नको
पाटकर यांना भेटण्यासाठी आलेल्या शिवोली, सांताव्रुझ, आंत आंद्रे, थिवी मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. “ आरजी नको, तुकाराम नको” अशा घोषणा यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिल्या. युती करण्यापूर्वी पक्षाच्या इतर पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना देखील विचारात आणि विश्वासात घ्या असा सल्लाही काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी अमित पाटकर यांना दिला. प्राप्त माहितीनुसार गोवा फॉरवर्डला दहा जागा आणि आरजी पक्षाला दहा जागा सोडण्याचे काँग्रेसने ठरविले आहे.
या तिन्ही पक्षांनी युती करून भाजपला हरवण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे तथापि काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांना ही युती मान्य नाही. दोन्ही पक्षांची शक्ती तपासून घ्यावी तसेच काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे, तो प्रादेशिक पक्ष नाही. त्यामुळे काँग्रेसचा मतांचा लाभ इतर पक्षांना होईल आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला ते जड जाईल, असा सल्ला यावेळी उपस्थितांनी पाटकर यांना दिला. या गडबड गोंधळानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देण्याचे राजन घाटे यांनी टाळले. अमित पाटकर यांनी अद्याप युती झालेली नाही एका पक्षाबरोबर बोलणी केली असून आज आणखी एका पक्षाबरोबर बोलणी करणार आणि बोलणी यशस्वी झाली तर तशी माहिती तुम्हाला देऊ एवढेच सांगितले.