राज्यात काँग्रेस 18 जागांवर लढणार! शाहू छत्रपती यांच्यासह 9 जणांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब
शाहू छत्रपती, नाना पटोले, प्रणिती शिंदे, रवींद्र धंगेकर, प्रतिभा धानोरकर यांच्यासह नऊ जणांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब : आज मुंबईत बैठक : यादी आज किंवा उद्या जाहीर होण्याची शक्यता
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापत चालले असताना बुधवारी राजधानी नवी दिल्लीत काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत महाराष्ट्रात 18 जागा लढविण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींच्या उपस्थितीत घेण्यात आला. बैठकीला काँग्रेचे राष्ट्रीय अध्यक्ष मलिकार्जुन खर्गे, माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह महाराष्ट्रातील नेते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार सतेज पाटील, आमदार वर्षा गायकवाड उपस्थित होत्या.
काँग्रेसच्या केंद्रीय समितीच्या बैठकीत महाराष्ट्रातील राजकीय स्थितीसह महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या भूमिकेवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील 48 पैकी 18 जागा काँग्रेस पक्षाने लढविण्यावर या बैठकीत एकमताने निर्णय घेण्यात आला. बैठकीत काही महत्वाच्या बहुचर्चित लोकसभा मतदार संघातील उमेदवारांच्या नावावरही एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले. यामध्ये भंडाऱ्यातून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, कोल्हापूरमधून श्रीमंत शाहू छत्रपती, सोलापूरमधून माजी मुख्यमंत्री तथा केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे, पुणे येथून पोट निवडणुकीत जायंट किलर ठरलेले आमदार रवींद्र धंगेकर, चंद्रपूरमधून प्रतिभा धानोरकर, नंदूरबारमधून के. सी. पाडवी यांचा मुलगा, अकोलातून अभय पाटील, नांदेडमधून वसंतराव चव्हाण, गडचिरोलीतून नामदेवर किरसान यांच्या नावांचा समावेश आहे. इतर काही जागांवरील नावांवर यावेळी चर्चा झाली.
आज मुंबईत बैठक
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयात आज मुंबईत बैठक होणार असून या बैठकीत सविस्तर चर्चा केल्यानंतर उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रदेश काँग्रेसकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर नवी दिल्लीतून यादी जाहीर होणार असल्याचेही सांगण्यात आले.
ठाकरे, शरद पवार गटासाठी राहणार 30 जागा
काँग्रेसने 18 जागांवर लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता महाविकास आघाडीतील घटक पक्ष असणाऱ्या शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट या दोन्ही पक्षांसाठी 30 जागा राहणार आहेत. त्यामध्ये कशी विभागणी होणार?, कशा पद्धतीने जागांचे वाटप (सीट शेअरिंग) होणार?, अॅड. प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी सोबत असल्यास त्यांना किती जागा देणार? या बद्दल आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
अॅड. आंबेडकर यांची टिका आणि ठाकरे, पवार गटाची भूमिका
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांनी फसवणूक केल्याचा आरोप केला होता. त्याचबरोबर त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खर्गे यांना पत्र लिहून सात जागांवर पाठिंबा देतो, त्या जागांची नावे सांगा असे आवाहन केले होते. त्या पार्श्वभूमीवर आता वंचितला देण्यात येणाऱ्या जागांबाबत महाविकास आघाडीतील काँग्रेससह ठाकरे गट आणि शरद पवार गट यांची भूमिका काय असणार आहे? याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.
उमेदवारी निश्चित झालेले नऊ उमेदवार असे :
काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत निश्चित करण्यात आलेले उमेदवार असे : प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (भंडारा), शाहू छत्रपती (कोल्हापूर), प्रणिती शिंदे (सोलापूर), रवींद्र धंगेकर (पुणे), प्रतिभा धानोरकर (चंद्रपूर), के. सी. पाडवी यांचा मुलगा (नंदूरबार), अभय पाटील (अकोला), वसंतराव चव्हाण (नांदेड), नामदेव किरसान (गडचिरोली).
वंचितचा प्रस्ताव फेटाळला
काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिलेला सात जागांची नावे सुचविण्याचा प्रस्ताव फेटाळण्यात आला. त्यामुळे वंचितबाबतच्या महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या भुमिकेबद्दल संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.