राज्यसभेसाठी काँग्रेसला क्रॉस वोटींगची भीती
भाजप-निजद युतीकडून पाचवा उमेदवार : कुपेंद्र रेड्डीना उतरविले निवडणूक रिंगणात
बेंगळूर : कर्नाटक विधानसभेवरून राज्यसभेच्या 4 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी पाचवा उमेदवार म्हणून भाजप-निजद युतीने कुपेंद्र रेड्डी यांना उमेदवारी दिली आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार काँग्रेसला तीन आणि भाजपला एक जागा जिंकणे सहज शक्य आहे. परंतु, युतीतर्फे पाचवा उमेदवार देण्यात आल्याने काँग्रेसला क्रॉस वोटींगची भीती सतावत आहे. भाजपने नारायणसा भांडगे यांना तर काँग्रेसने अजय माकन, नासीर हुसेन आणि जी. सी. चंद्रशेखर यांना उमेदवारी जाहीर केली. बुधवारपर्यंत राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होईल, अशी चर्चा होती. मात्र, गुरुवारी सकाळी अचानक भाजप-निजद युतीने पाचवा उमेदवार रिंगणात उतरविला. या निवडणुकीत जिंकण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला 45 मतांची आवश्यकता आहे. काँग्रेसजवळ 135 आमदार असून भाजपजवळ 66, निजदकडे 19 आमदार आहेत. कल्याण राज्य प्रगती पक्षाचे आमदार जनार्दन रेड्डी , सर्वोदय कर्नाटक पक्षाचे दर्शन पुट्टणय्या, अपक्ष आमदार लता मल्लिकार्जुन आणि के. पी. पुट्टस्वामी अशी कर्नाटक विधानसभेचे सदस्यसंख्या आहे.
दर्शन पुट्टणय्या, लता मल्लिकार्जुन व पुट्टस्वामी यांनी यापूर्वीच काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. परंतु, सुरुवातीला काँग्रेसला समर्थन देणारे जनार्दन रे•ाr यांचा कल आता भाजपकडे असल्याचे सांगण्यात येते. काँग्रेस पक्ष आपल्या तीन उमेदवारांना प्रत्येकी 45 मतांची विभागणी करणार आहे. शिवाय 3 अपक्ष आमदारांची मतेही मिळतील, अशी आशा काँग्रेसला आहे. भाजप देखील अपक्ष, जनार्दन रेड्डी आणि दर्शन पुट्टणय्या यांची मते मिळवून काँग्रेसच्या दोन-तीन नाराज आमदारांची मते मिळविण्याच्या प्रयत्नात आहे. भाजपने आपल्या उमेदवाराला मत विभागणी केल्यानंतर उर्वरित 21 अतिरिक्त मते, निजदची 19 मतांची जुळवाजुळव केल्यास 40 मते एकत्रित होतात. ही मते भाजप-निजद युतीचे उमेदवार कुपेंद्र रे•ाr यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र कुपेंद्र रे•ाRना विजयासाठी आणखी 5 मतांची गरज भासणार आहे. ही मते अपक्ष आणि काँग्रेसमधील असंतुष्टांच्या साहाय्याने पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न भाजप-निजदकडून होण्याची शक्यता आहे.
एकूण 7 उमेदवार रिंगणात
राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा गुरुवारी शेवटचा दिवस होता. गुरुवारी 6 उमेदवारांनी एकूण 17 अर्ज दाखल केले. भाजपचे उमेदवार नारायणसा भांडगे यांनी दोन, काँग्रेसचे उमेदवार अजय माकन, नासीर हुसेन आणि जी. सी. चंद्रशेखर यांनी प्रत्येकी चार, निजद-भाजप युतीचे उमेदवार डी. कुपेंद्र रेड्डी यांनी चार आणि अपक्ष उमेदवार मल्लिकार्जुन केंगनूर यांनी एक अर्ज दाखल केला. अपक्ष उमेदवार डॉ. के. पद्मराजन यांनी 8 फेब्रुवारी रोजी एक अर्ज सादर केला. राज्यसभा निवडणुकीसाठी कर्नाटकातून एकूण 7 उमेदवारांनी 18 अर्ज दाखल केले आहेत. शुक्रवारी अर्ज छाननी होईल. अर्ज मागे घेण्यासाठी 20 फेब्रुवारी शेवटचा दिवस आहे.