डॉ. आंबेडकरांच्या विरोधातील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे पोस्टर दहन करून केली निदर्शने : तहसीलदारांना निवेदन
खानापूर : गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेण्याची फॅशन बनली असून, त्यांचे नाव घेण्याऐवजी देवाचे नाव घेतल्यास स्वर्ग मिळेल, असे वक्तव्य केल्याने देशात सर्वत्र अमित शहा यांचा निषेध करण्यात येत आहे. खानापूर ब्लॉक काँग्रेसच्यावतीने गुरुवारी सकाळी 11 वाजता येथील शिवस्मारक चौकात जोरदार निदर्शने करून अमित शहा यांच्या पोस्टरचे दहन करण्यात आले. यानंतर तहसीलदार प्रकाश गायकवाड यांना निवेदन सादर करण्यात आले. अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी खानापूर ब्लॉक काँग्रेसने निषेध रॅलीचे आयोजन केले होते. येथील शिवस्मारक चौकात जोरदार निदर्शने करून अमित शहा यांच्या धिक्काराच्या घोषणा देण्यात आल्या. तसेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. पोस्टरचे दहन केल्यानंतर मोर्चाने तहसीलदार कार्यालयावर जावून त्या ठिकाणी निषेध सभा घेतली.
अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी
यावेळी अर्बन ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष महातेश राऊत, महादेव कोळी, यशवंत बिरजे, गौसलाल पटेल, लक्ष्मण मादार, सावित्री मादार, चंबाण्णा होसमणी, जॅकी फर्नांडिस यांनी अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणारी भाषणे केली. यानंतर तहसीलदार प्रकाश गायकवाड यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे.
राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्याचे आश्वासन
तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी निवेदनाचा स्वीकार करून आपण हे निवेदन राष्ट्रपतीना पाठवू, असे आश्वासन दिले. या निषेध मोर्चात काँग्रेसचे कार्यकर्ते प्रसाद पाटील, विनायक मुतगेकर, ईश्वर बोबाटे, शफीक काजी, सुरेश जाधव, तोईद चांदकनावर, गुड्डु टेकडी यासह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.