मतपत्रिकेद्वारे निवडणुकीसाठी काँग्रेसचे अभियान
पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची घोषणा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्याच्या मागणीसाठी काँग्रेसने देशव्यापी अभियान राबविण्याची घोषणा केली आहे. पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मंगळवारी याची माहिती दिली आहे. मतपत्रिकेद्वारेच निवडणूक व्हावी अशी आमची इच्छा आहे आणि आम्ही याकरिता भारत जोडो यात्रेच्या धर्तीवर देशभरात अभियान चालविणार आहोत, असे खर्गे यांनी म्हटले आहे.
ओबीसी, एससी, एसटी अणि वंचित वर्गातील लोकांकडून केले जाणारे मतदान हे वाया जात असल्याचे मी म्हणू इच्छितो. याचमुळे आम्ही मतपत्रिकेद्वारे निवडणूक घेण्याची मागणी करत आहोत. ईव्हीएमच्या समर्थकांनी स्वत:च्या घरात ईव्हीएम ठेवून घ्यावे. अहमदाबादमध्ये अनेक गोदाम असून तेथे ईव्हीएम्स ठेवाव्यात. मतपत्रिकेद्वारे निवडणूक झाली तर संबंधितांना त्यांचे स्थान कळून चुकेल, असे खर्गे यांनी म्हटले आहे.
आमच्या पक्षाने सुरू केलेल्या अभियानात सर्व पक्षांनी भाग घ्यावा. राहुल गांधींच्या नेतृत्वात आम्ही भारत जोडो यात्रा आयोजित केली होती. त्याच धर्तीवर आम्ही पूर्ण देशात अभियान राबविणार आहोत, असे खर्गे यांनी म्हटले आहे. याचबरोबर खर्गे यांनी जातनिहाय जनगणनेचा मुद्दा उपस्थित केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जातनिहाय जनगणनेला घाबरत आहेत. समाजातील प्रत्येक वर्ग स्वत:ची हिस्सेदारी इच्छित असून त्याकरिता मागणी करत असल्याचे मोदींनी समजून घ्यावे, असे उद्गार खर्गे यांनी काढले आहेत. मोदींना खरोखरच देशात एकता हवी असेल तर त्यांनी द्वेष फैलावणे बंद करावे असेही खर्गे यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या दारुण पराभवानंतर काँग्रेसचे नेते ईव्हीएमबद्दल संशय व्यक्त करत आहेत. स्वत:च्या पराभवाकरिता ईव्हीएम जबाबदार असल्याचे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे.