महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

काँग्रेसकडून ‘नव सत्याग्रहा’ची हाक

06:59 AM Dec 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

शतक महोत्सवानिमित्त काँग्रेस राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक : आरएसएस-भाजपवर टीका

Advertisement

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisement

महात्मा गांधीजींच्या अध्यक्षतेखाली बेळगाव येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या शतक महोत्सवानिमित्त गुरुवारी वीरसौध परिसरात काँग्रेस राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसच्या नेत्यांनी ‘गांधी भारत’ व ‘नव सत्याग्रहा’ची हाक देत देशात लोकशाहीचा सातत्याने होत असलेल्या अध:पतनाबद्दल चिंता व्यक्त केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पक्षाच्या पुढील वाटचालीबद्दल चिंतन मंथन करण्यात आले. या बैठकीत आरएसएस व भाजपवर टीका करण्यात आली. लोकशाहीचे सातत्याने अध:पतन होत आहे. निवडणूक आयोग व प्रसार माध्यमांवर दबाव तंत्राचे राजकारण करण्यात येत आहे. एक राष्ट्र एक निवडणूक या विधेयकामुळे सांघिक व्यवस्थेवर सातत्याने हल्ले होत आहे. याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे. काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी आपल्या एक्स खात्यावर कार्यकारिणीत झालेल्या चर्चेविषयी माहिती दिली. हरियाणा व महाराष्ट्रात ज्या प्रकारे निवडणुका झाल्या ते लक्षात घेता निवडणूक व्यवस्थेवरच शंका निर्माण होते.

देशात अल्पसंख्याकांना लक्ष्य बनवून जातीय तेढ निर्माण केले जात आहे, ही चिंतेची बाब आहे. मणिपूरमधील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. पंतप्रधान व केंद्र सरकार आजही मणिपूरच्या प्रश्नाबद्दल उदासीन आहे. पंतप्रधानांनी हिंसाचारग्रस्त मणिपूरला भेट दिली नाही. संघ व भाजपच्या राजकीय फायद्यासाठी संभल व इतर ठिकाणी जातीय तणाव निर्माण केल्याचा आरोपही काँग्रेस कार्यकारिणीत करण्यात आला आहे.

आसाम आणि उत्तर प्रदेशसारख्या भाजपप्रणित राज्यामधील परिस्थितीचाही कार्यकारिणीत आढावा घेण्यात आला असून त्या राज्यात काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. यावरून भाजपची लोकशाहीविरोधी मानसिकता दिसून येते. सामाजिक-आर्थिक-जात निहाय जनगणती लवकरात लवकर व्हावी या मागणीवर काँग्रेसच्या कार्यकारिणीत शिक्कामोर्तब करण्यात आले असून अनुसूचित जाती/जमातीच्या आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांनी वाढविण्याची गरजही व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे वंचित घटकांना आणखी लाभ होणार आहे. भ्रष्टाचार व महागाईविरुद्ध लढण्याचा निर्धार कार्यकारिणीत करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आर्थिक धोरणे केवळ पंतप्रधानांच्या आवडत्या व्यावसायिक गटांपैकी काहींना समृद्ध करण्यासाठी राबविण्यात येत आहेत. आगामी केंद्रीय अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांना करसवलत जाहीर करावी. गोरगरीबांचे उत्पन्न वाढीसाठी योजना राबविण्याची मागणी करण्यात आली असून उद्योग, व्यापार आणि व्यवसायावरील करवाढ थांबली पाहिजे, असे सांगतानाच कृषी आणि ग्रामीण भागातील रोजगारांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल सरकारवर टीका करण्यात आली आहे.

वाढते उत्पन्न खर्च व शेतीमालाचे दर गडगडल्यामुळे शेतकरी अडचणीत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी दिलेल्या आश्वासनांची सरकारला विसर पडली आहे. मनरेगा योजनेसाठी जाणीवपूर्वक कमीतकमी निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे अनेक गरीब कुटुंबे जगण्यासाठी संघर्ष करीत आहेत. या परिस्थितीत सुधारणा करण्याची मागणी काँग्रेस कार्यकारिणीने केली असून मनरेगा योजनेसाठी पुरेसा निधी द्यावा. तसेच मजुरी रोज 400 रुपये याप्रमाणे वाढवावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

पूर्व लडाखमधील भारतीय आणि चिनी सैन्यांमधील मतभेद दूर करण्यासाठी परराष्ट्र मंत्र्यांनी केलेल्या घोषणेविषयी कार्यकारिणीत चर्चा करण्यात आली. सरकारने या मुद्द्यावर विरोधी पक्षांना विश्वासात घेऊन प्रत्यक्ष सीमारेषेवर काय परिस्थिती आहे, याविषयी संसदेत चर्चा करण्याची परवानगी द्यावी, या मागणीचा पुनरुच्चार करतानाच बांगलादेशमधील धार्मिक अल्पसंख्याकांवरील हल्ल्यांबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे. त्यांची सुरक्षा व आरोग्यासाठी केंद्र सरकारने बांगलादेशच्या अंतरिम सरकाराबरोबर चर्चा करण्याची विनंती करण्यात आली आहे.

संविधानाचे संरक्षण करण्यासाठी काँग्रेस वचनबद्ध असल्याचे कार्यकारिणीत जाहीर करण्यात आले आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ अभियान सुरू करण्यात येणार आहे. 27 डिसेंबर रोजी बेळगाव येथे या अभियानाला सुरुवात करण्यात येणार आहे. 26 जानेवारी 2025 रोजी महू येथे समारोप करण्यात येणार आहे. संविधान स्वीकारून 75 वर्षे पूर्ण झाली. त्याच्या वर्धापन दिनानिमित्त ब्लॉक, जिल्हा व राज्य पातळीवर अनेक कार्यक्रम हाती घेण्याचे ठरविण्यात आले असून महात्मा गांधीजींचा वारसा, राज्य घटनेचे जतन व संरक्षण आणि संवर्धन करण्याची निकड लक्षात घेता 26 जानेवारी 2025 नंतरही हे अभियान देशभरात सुरू ठैवण्यात येणार आहे. 26 जानेवरी 2026 पर्यंत गावोगावी मोहीम राबविण्याचे ठरविण्यात आले आहे. एप्रिल 2025 मध्ये गुजरातमधील साबरमती येथे अखिल भारतीय काँग्रेस समितीची बैठक आयोजित करण्याचेही कार्यकारिणीत ठरविण्यात आले आहे. एआयसीसीचे के. सी. वेणुगोपाल यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली आहे. या बैठकीत जयराम रमेश, रणदीपसिंग सुर्जेवाला यांच्यासह अनेक राष्ट्रीय व राज्य पातळीवरील नेत्यांनी भाग घेतला होता.

सोनिया गांधी, प्रियांका गैरहजर

बेळगाव येथील वीरसौध परिसरात गुरुवारी झालेल्या काँग्रेस कार्यकारिणी बैठकीला काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, खासदार प्रियांका वाड्रा गैहजर राहिल्या. सोनिया गांधी यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र पाठविले असून सामूहिकपणे पक्ष संघटन वाढविण्याची हाक दिली आहे. सध्या दिल्लीत ज्यांची सत्ता आहे, ते स्वातंत्र्यासाठी कधीच लढले नाहीत. महात्मा गांधीजी यांचे विरोधक आणि त्यांची हत्या करणाऱ्यांचीच तळी उचलण्यात आली आहेत. गांधी तत्त्वावर चालणाऱ्या संस्थांवर हल्ले होत असून अशा परिस्थितीत झालेल्या कार्यकारिणीला नव सत्याग्रह बैठक असे नाव देणे योग्य असल्याचेही सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article