काँग्रेसने भरभरून दिले असले तरी...येत्या दोन दिवसात भुमिका मांडणार- अशोक चव्हाण
मला कुणाचीही उणीदुणी काढायची नाहीत किंवा मी कुणावरही नाराज नाही. गेली अनेक वर्षे मी काँग्रेसचे काम केले काँग्रेसने मला भरभरून दिले असले तरी त्याचबरोबर मीही काँग्रेससाठी भरपूर राबलो. मी आज काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून येत्या दोन दिवसामध्ये मी माझी भुमिका मांडणार असल्याचं स्पष्टीकरण काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
काँग्रेसच्या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आणि काँग्रेसचा राज्यातील एक आश्वासक चेहरा म्हणून ओळखले जाणारे अशोक चव्हाण यांनी आज आपल्या पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्याअगोदर त्यांनी विधानसभेचे सभापती राहूल नार्वेकर यांची भेट घेऊन आपल्या आमदारकीचाही राजीनामा दिला होता.
गेल्या वर्षभरापासून अशोक चव्हाण हे काँग्रेस अंतर्गत राजकारणामुळे नाराज असल्याच्या बातम्या येत असून ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जात होतं. पण आज त्यांच्या चर्चेला पुर्ण विराम मिळाला आहे. आज माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, "मी लहानपणापासून काँग्रेससोबत काम केलं आहे. पक्षानं मला भरपूर दिले असले तरी माझंही पक्ष वाढीसाठी मोठं योगदान आहे. आज मी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्याच बरोबर मी विधानसभा सदस्य राहूल नार्वेकर यांची भेट घेऊन आमदारकीचाही राजीनामा दिला आहे. मला कोणाचीही उणी दुणी काढायची नाहीत. काँग्रेस शिवाय थोडा वेगळा विचार करण्यासाठीच मी राजीनामा दिला आहे. मी दोन दिवसामध्ये आपली राजकिय भुमिका काय असेल याची माहीती देणार आहे."