न्यायालयीन लढा जिंकल्याबद्दल ‘तरुण भारत’वर अभिनंदनाचा वर्षाव
मंत्री गोविंद गावडे, कला अकादमीला चपराक
पणजी : वादग्रस्त कारभारासाठी बदनाम झालेल्या कला अकादमी या संस्थेने खोटे आरोप करून त्यांच्या नियमबाह्य बढत्यांविऊद्ध वृत्त प्रसिद्ध केलेल्या दैनिक तरुण भारतवर 50 लाखांच्या अब्रुनुकसानीचा केलेला दावा न्यायालयाने फेटाळल्याबद्दल राज्यातील सर्व स्तरावरून ‘तरुण भारत’चे अभिनंदन आणि कौतुक होत आहे. ‘न्यायालयाची कला अकादमीला चपराक’ या सदराखाली गुरुवारी प्रसिद्ध झालेले वृत्त राज्य आणि देशपातळीवरही चांगलेच गाजले. अनेक वृत्तवाहिन्यांनी सदर वृत्त ‘ब्रेकिंग न्यूज’ केले. गुरुवारी दिवसभर जनतेच्या मोबाईलवर हे वृत्त झळकले. या वृत्ताची कटिंग काढून अनेकांनी आपापल्या मित्र- नातेवाईकांच्या गटात प्रसारित केली. अनेकांनी आपल्या व्हॉट्सअॅपच्या स्टेट्सवर हे वृत्त ठेवून तरुण भारतचे अभिनंदन केले. काहींनी आपल्या फेसबुकच्या अकाऊंटवर या वृत्ताचे कटिंग अपलोड केले. तेथेही तरुण भारतवर अभिनंदनाचा वर्षावर झाला.
व्हॉट्सअॅप, फेसबुकवरुन शुभेच्छा
अनेकांनी तरुण भारतचे संपादक व अन्य सहकाऱ्यांना फोन करुन, मोबाईलवर संदेश पाठवून अभिनंदन केले. ‘मस्त धंडा शिकवलात’, ‘तरुण भारत आगे बढो’, ‘सत्याशी लढा, लोकशाहीचा चौथा स्तंभ जीवंत ठेवा’ असे प्रोत्साहनपर संदेश पाठविण्यात आले. अनेकांनी तरुण भारतच्या कार्यालयात आणि संपादक व अन्य सहकाऱ्यांची भेट घेऊन खास अभिनंदन केले.
ज्येष्ठ पत्रकारांकडून अभिनंदन
ज्येष्ठ पत्रकारांनीही तरुण भारतचे अभिनंदन केले. ‘खुलासा प्रसिद्ध केल्यानंतरही खटला भरून आणि तो खटला हरून स्वत:च कानफटात मारून घेण्याचा प्रकार’ कला अकादमीने केला आहे. अभिनंदन तरुण भारत’ असे संदेश पाठवून अभिनंदन केले. एका माजी संपादकाने गुऊवारच्या बातमीच्या शीर्षकामध्ये केवळ एक छोटासा बदल करून (सल्पविराम घालून) ‘न्यायालयाची कला, अकादमीला चपराक’ अशी मार्मिक दाद दिली. या अब्रुनुकसानी खटल्यात न्यायालयाने आपल्या ऐतिहासिक निकालात प्रसार माध्यम हा लोकशाहीचा स्तंभ असून तो जनतेचा आवाज आहे. जनतेचा आवाज दाबण्याचा नाहक प्रयत्न केल्याबद्दल उलट एक लाख रुपयांचा दंड ठोठावल्याबद्दलही अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि जाणकारांनी समाधान व्यक्त केले.
मडगाव येथील डॉ. मनोज हेदे यांनी संपादकांना पाठवलेल्या आपल्या संदेशात म्हटले आहे की, कला अकादमीत झालेल्या बेकायदेशीर बढत्यांचा भांडाफोड केल्याबद्दल आपल्याला आणि आपल्या संपूर्ण टीमचे मन:पूर्वक अभिनंदन. या प्रकरणात आपण गेली पाच वर्षे सातत्याने लढा दिला आणि अखेर त्या बढती बेकायदेशीर असल्याचे सिद्ध करून दाखवले. हे एक पत्रकारितेचे उत्तम उदाहरण आहे. सतत वादग्रस्त कारणांनी चर्चेत असलेले मंत्री गोविंद गावडे यांनी या प्रकरणाची नैतिक जबाबदारी घेऊन तात्काळ राजीनामा द्यायला हवा. पण त्याच्या उलट ते उच्च न्यायालयात गेले तरी नवल नाही. आता तरी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी योग्य ती कारवाई करत, त्यांना पदावरून हटवले पाहिजे. पुन्हा एकदा आपल्या धाडसी पत्रकारितेसाठी मन:पूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा!