कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राज ठाकरेंच्या आदेशाने युतीबाबत संभ्रम

06:44 AM Jul 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मराठी विजयी मेळाव्यासाठी ठाकरे बंधू एकत्र आले, पण एकत्र राहणार का? हा सवाल आता राज ठाकरे यांच्या आदेशानंतर उपस्थित होत आहे. तब्बल 20 वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र आल्याने राज्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने राज्यातील राजकीय समीकरणे कशी बदलतील याच्या चर्चा सुरू झाल्या. शिवसेना ठाकरे गटाकडून उध्दव ठाकरे यांनी मेळाव्यात बोलताना एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी असे पुढील युतीबाबत स्पष्ट संकेत दिले. शिवसेनेकडून संजय राऊत यांनी देखील युतीबाबत शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली, मात्र मनसेकडून ना राज ठाकरे ना कोणत्या नेत्याने युतीबाबत स्पष्ट भूमिका मांडलेली नाही. उलट राज ठाकरे यांनी मनसेचे पदाधिकारी आणि नेत्यांना युतीबाबत कोणीही बोलू नये, बोलताना आधी मला विचारावे असे आदेश दिल्याने शिवसेना-मनसे युतीबाबत मोठा व्ट्सि्ट निर्माण झाला आहे.

Advertisement

तुम्ही एक पाऊल पुढे टाका राज ठाकरे शंभर पाऊल पुढे येईल, असे वक्तव्य काही वर्षापूर्वी राज ठाकरे यांनी उध्दव ठाकरेंना केले होते. मनसेच्या स्थापनेनंतर राज ठाकरे यांनी उध्दव ठाकरेंसोबत युती करण्यासाठी अनेकदा टाळी दिली होती, मात्र त्याला उध्दव ठाकरेंनी म्हणावा तसा प्रतिसाद दिला नसल्याचे राज ठाकरे यांनी आपल्या मुलाखतीतून वारंवार सांगितले.

Advertisement

मनसेच्या स्थापनेनंतर 2009 च्या पहिल्याच विधानसभा निवडणूकीत राज यांनी आपले 13 आमदार निवडून आणले, मात्र त्यानंतर झालेल्या कोणत्याच निवडणूकीत राज यांना म्हणावे तसे यश मिळाले नाही. ज्यांना मोठी पदे दिली, आमदार बनवले तेच राज यांना सोडून गेले. मनसे आणि शिवसेनेमुळे मराठी मतांचे होणारे विभाजन याचा दोन्ही पक्षांना मोठा फटका निवडणुकीत बसत होता. त्याचा फायदा हा अप्रत्यक्षपणे इतर पक्षांना होत होता, मुंबईत संजय निरूपम, मिलिंद देवरा, गुरूदास कामत हे केवळ मराठी मतांच्या विभाजनामुळे खासदार झाले. राज उध्दव यांच्या स्वतंत्र लढण्याने मराठी माणसाचे नुकसान होत असल्याने, या दोघांनी एकत्र येण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला. मात्र काही उपयोग झाला नाही. अखेर ठाकरे ब्रॅन्ड टिकवण्यासाठी आणि मराठी भाषेसाठी ठाकरे बंधू एकत्र आले. एकत्र आल्यानंतर एकत्र राहणार का? याची चर्चा आता सुरू झाली आहे.

उध्दव ठाकरे यांनी युतीचे स्पष्ट संकेत दिले, मात्र राज ठाकरे यांच्याकडून मात्र तसे काही संकेत किंवा स्पष्टता येताना दिसत नाही. त्यामुळे मनसेचे इंजिन शिवसेनेच्या डब्याला लागणार का? हा आता महत्त्वाचा सवाल उपस्थित झाला आहे. राज आणि उध्दव ठाकरे हे जरी मेळाव्यासाठी एकत्र आले असले तरी त्यांच्या मनातील गेल्या 20 वर्षातील किंतु परंतु मिटणे गरजेचे आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेला घरघर लागली आहे. मुंबईतील ठाकरेंचे जवळपास 45 नगरसेवक शिंदे गटात गेले आहेत, राज ठाकरे यांच्या पक्षाला गेल्या तीन विधानसभा निवडणूका आणि दोन महापालिका निवडणूकीत समाधानकारक यश मिळत नसताना देखील मनसेचे कार्यकर्त्यांचे केडर मजबुत आहे.

पक्ष नेतृत्वाने दिलेला आदेश पाळण्यात आणि त्वरीत रिझल्ट देण्यात आजही मनसेचा एक नंबर लागतो. त्या तुलनेत 25 वर्षे महापालिकेत सत्ता असताना देखील उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेला लागलेली ओहोटी ही कमी होताना दिसत नाही. जेव्हा माणसाकडे यश किर्ती आणि प्रसिध्दी असते त्याच वेळी त्याची खरी कसोटी असते की तो त्याच्या सोबत कोणाला घेतो आणि कोणाचा उध्दार करतो. राज यांनी आपल्या राजकीय कसोटीच्या काळात उध्दव ठाकरेंकडे मैत्रीसाठी हात पुढे केला होता, मात्र उध्दव ठाकरे यांनी प्रतिसाद दिला नाही. आता वेळ बदलली असून उध्दव ठाकरे हे युतीसाठी आतुर झाले असून, राज मात्र स्पष्ट भूमिका घेताना दिसत नाहीत. यामागच्या कारणांचा विचार केला तर, आजही शिवसेनेपेक्षा मनसेचे कार्यकर्ते आक्रमक आहेत. मराठी भाषेचा अपमान करणाऱ्यांना जिथे जिथे चोप मिळाला, तो मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिला. त्यामुळे प्रादेशिक अस्मिता, मराठी बाणा या विषयांवर जर दोन पक्ष एकत्र येत असतील तर त्यात जी काही रस्त्यावर आंदोलन, निदर्शने होणार आहेत, त्यात मनसेचे कार्यकर्ते हेच आघाडीवर दिसणार आहेत. मात्र फायदा हा उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेला होणार आहे,

विजयी मेळाव्यासाठी एकत्र येणे आणि एखाद्या आंदोलनासाठी एकत्र येणे हे वेगळं आहे. मनसेचा आज विधीमंडळात एकही आमदार नाही, तर शिवसेना ठाकरे गटाचे विधानसभेत 20 तर विधानपरिषदेत उध्दव ठाकरे यांच्यासह सात आमदार आहेत. मात्र सत्ताधारी पक्षाच्या पाशवी बहुमतापुढे विरोधक निष्प्रभ ठरताना दिसत आहे. राज ठाकरे यांच्या मनसेचे वैशिष्ट्या म्हणजे त्यांच्या पक्षाने गेल्या 19 वर्षात कोणाशीही निवडणूकपूर्व युती केलेली नाही. राज यांनी उध्दव ठाकरेंसोबत युती कऊ नये म्हणून देखील त्यांच्यावर दबाव आहे, पण तो स्विकारावा का झुगारावा हा त्यांचा मोठा राजकीय निर्णय असणार आहे. राज आणि उध्दव ठाकरे एकत्र लढल्यास मराठी मतांचे विभाजन टळणार आहे. ज्याचा मोठा फायदा ठाकरे बंधूंना होणार आहे, तर मराठी मतांचे एकत्रिकरण होऊन शिंदे गट आणि भाजपसमोर आव्हान उभं राहणार आहे.

मराठी भाषिकांनी ठाकरे बंधू एकत्र येण्याचे स्वागत केले आहे. त्यामुळे राज ठाकरे यांना या जनमताचा देखील कानोसा घ्यावा लागणार आहे, राज यांच्यासाठी युतीचा निर्णय हा पुढील भवितव्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असणार आहे. आतापर्यंत स्वतंत्र लढणं हा राज ठाकरेंचा स्वभाव राहिला आहे. कोणाशीच युती न करता राज स्वतंत्र लढू शकतात किंवा उध्दव ठाकरेंसोबतच्या युतीत आपली बार्गेर्निंग पॉवर वाढवण्यासाठी संभ्रम कायम ठेऊ शकतात. उत्कंठा वाढविणे हा त्यांचा स्वभाव आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी युतीबाबत अधिकृत भाष्य केल्यानंतरच पुढील राजकारणाची दिशा स्पष्ट होणार आहे.

प्रवीण काळे

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article