महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

प्रश्नपत्रिका उशिराने दिल्याने परीक्षार्थींचा गोंधळ

12:21 PM Aug 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

केपीएससी परीक्षेदरम्यान प्रकार : 15 मिनिटे उशिराने प्रश्नपत्रिका हाती : उत्तरपत्रिका सोडविण्यासाठी अधिक वेळ दिल्याने परीक्षा सुरळीत 

Advertisement

बेळगाव : कर्नाटक लोकसेवा आयोगातर्फे (केपीएससी) मंगळवारी गट अ व ब साठी घेण्यात आलेल्या परीक्षेदरम्यान प्रश्नपत्रिका उशिराने दिल्याने उमेदवारांनी गोंधळ घातला. शहरातील अंजुमन कॉलेज परीक्षा केंद्रावर 15 मिनिटे उशिराने प्रश्नपत्रिका दिल्याने परीक्षार्थींनी आक्षेप घेतला. यामुळे काहीकाळ परीक्षार्थी व पर्यवेक्षकांमध्ये वादावादीचे प्रकार घडले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत उत्तरपत्रिका सोडविण्यासाठी 15 मिनिटे अधिक वेळ दिला जाईल, असे सांगितल्यानंतर परीक्षा सुरळीत सुरू झाली.

Advertisement

मंगळवारी बेळगावमधील 53 केंद्रांवर केपीएससीअंतर्गत परीक्षा घेण्यात आली. शासकीय सेवेत रुजू होऊ इच्छिणाऱ्या परीक्षार्थींनी या परीक्षेसाठी जोरदार तयारी केली होती. मंगळवारी सकाळ व दुपारच्या सत्रात परीक्षा होणार होत्या. यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. परंतु वेळ होऊनदेखील प्रश्नपत्रिका परीक्षार्थींपर्यंत देण्यात न आल्याने उमेदवारांनी पर्यवेक्षक, तसेच केंद्र प्रमुखांना जाब विचारला. वादावादीचा प्रकार झाल्याने परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला.

जिल्हाधिकाऱ्यांची शिष्टाई आली कामाला

केपीएससी परीक्षेदरम्यान गोंधळ झाल्याची माहिती समजताच जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी यांनी तात्काळ परीक्षा केंद्राकडे धाव घेतली. झालेला प्रकार जाणून घेत परीक्षार्थींनाही शांत राहण्याचा सल्ला दिला. बेंगळूर येथील केपीएससीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मोबाईलवरून संवाद साधत परीक्षेसाठी जादा वेळ मंजूर करून घेतला. जिल्हाधिकाऱ्यांच्या शिष्टाईमुळे परीक्षार्थींनीही नरमाईची भूमिका घेतली.

पेपरफुटीच्या अफवांमुळे अधिकाऱ्यांची भंबेरी

प्रश्नपत्रिका वेळेत न मिळाल्यामुळे उमेदवारांनी गोंधळ घातला. ही बातमी काही क्षणातच शहरभर पसरली. परंतु केपीएससी परीक्षेचा पेपर फुटल्याच्या अफवा पसरल्याने अधिकारीवर्गाचीही भंबेरी उडाली. शालेय शिक्षण विभाग, पदवीपूर्व शिक्षण विभाग, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासनाचे अनेक वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. काही पालकदेखील परीक्षा केंद्रांच्या परिसरात दिसून आले. परंतु पेपरफुटीची केवळ अफवा होती. 15 मिनिटे उशिराने प्रश्नपत्रिका दिल्याने गोंधळ झाल्याचे समजताच सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

ओएमआर शीटचा बदल अन् परीक्षेस विलंब

अंजुमन परीक्षा केंद्रात एकूण 11 वर्ग खोल्या आहेत. त्यापैकी चार वर्ग खोल्यांमध्ये चुकीच्या क्रमांकाच्या ओएमआर शीट देण्यात आल्या. ओएमआर शीट बदलल्याने परीक्षेस 15 मिनिटे विलंब झाला. योग्यप्रकारे ओएमआर शीट लावून त्याचे वाटप करेपर्यंत विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला. या प्रकरणाची चौकशी केली जाणार असून कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिला.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article