Kolhapur : कोल्हापूर महापालिकेच्या मतदार यादीत घोळ ; पतीचे नाव गायब, मुलगा प्रभाग सातमध्ये तर पत्नी दहामध्ये
कोल्हापूर महापालिकेच्या मतदार यादीत मोठा गोंधळ उघड
कोल्हापूर : प्रभाग क्रमांक आठ मधील शिवाजी पेठेतील एकाच कुटुंबात पतीचे नाव मतदार यादीतून गायब झाले आहे. तर पत्नीचे नाव प्रभाग क्रमांक १० मध्ये तर मुलाचे नाव प्रभाग क्रमांक ७मध्ये गेल्याचे समोर आले आहे. यावरुन महापालिकेच्या प्रारुप मतदार यादीत मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचे समोर आले आहे. मंगळवारी दिवसभरात महापालिकेकडे ८० हरकती प्राप्त झाल्या. तर आजअखेर एकूण १४३ हरकती प्राप्त झाल्या आहेत.
कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी १७ रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध झाली. मतदार यादीवर हरकती दाखल करण्यासाठी २७ रोजीपर्यंत मुदत आहे. मतदार यादीतील नावे मोठ्या प्रमाणात इतर प्रभागात गेल्याने हरकतींची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहेत.
प्रारुप मतदार यादीवर मंगळवारी दिवसभरात ८० हरकती प्राप्त झाल्या. यापैकी सर्वाधिक तक्रारी विभागीय कार्यालय दोनमध्ये दाखल झाल्या आहेत. एकूण ३५ हरकती मिळाल्या आहेत. तर विभागीय कार्यालय एकमध्ये २१, तीनमध्ये १५ आणि चारमध्ये ९ हरकती आल्या आहेत.
यामध्ये मतदार यादीमध्ये नाव असून देखिल प्रभागात नाव समाविष्ट नसल्याबाबतच्या ६ तक्रारी आहेत. चुकीच्या प्रभागात नाव समाविष्ट झाल्याच्या ३१ हरकती आल्या आहेत. विधानसभा मतदार यादीत नाव नसूनही सध्या मतदार यादीत नाव असल्याच्या ४२ हरकती आल्या आहेत. तर अन्य स्वरुपाची एक हरकत प्राप्त झाली आहे.