महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

नव्या भूमिकेने पुन्हा संभ्रम

06:39 AM Aug 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भुल दिल्याशिवाय ऑपरेशन आणि दिशाभुल केल्याशिवाय राजकारण करता येत नाही असे महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब भारदे म्हणत असत. आज महाराष्ट्राच्या राजकारणात भुल भुलय्या निर्माण करण्यात सगळ्याच राजकीय पक्षांची स्पर्धा लागली असून शरद पवारांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सपत्नीक भेट घेणे, मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर कोणताही नेता थेट भूमिका घेत नसताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नसून पुन्हा एकदा महाराष्ट्रातील स्थानिकांना नोकऱ्या देण्याचा मुद्दा मांडल्याने आगामी काळात जसजशा विधानसभा निवडणूका जवळ येतील तस तसे राजकीय पक्ष एक एक मुद्दा काढुन लोकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण कऊन खुंटा हलवुन बळकट करण्याचा प्रयत्न करत आहेत.

Advertisement

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात धक्कादायक निकालानंतर आता विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकण्यास सगळ्या पक्षांनी सुरूवात केली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते उध्दव ठाकरे यांनी कधी नव्हे ते एकेरी भाषेत बोलताना पुण्यात  भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय नेते अमित शहा यांना आव्हान दिल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलीच खळबळ माजली. एक तर मी तरी राहीन नाहीतर फडणवीस तरी राहतील असे आव्हान ठाकरे यांनी दिल्यानंतर भाजप आणि शिवसेना नेत्यामंध्ये रोज आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडु लागल्या आहेत.

Advertisement

दुसरीकडे नागपूरातील दोन नेते विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात आता पुन्हा एकदा दावे -प्रतिदावे करण्यात येऊ लागल्यानंतर सचिन वाझे यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले असून 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणाचा जो पोत बिघडला तो एकनाथ शिंदे आणि फडणवीस सरकार नंतर सुधारेल असे वाटले होते. मात्र महाराष्ट्राच्या राजकारणातील संभ्रमावस्था कायम आहे. लोकसभा निवडणूक निकालात राज्यातील जनतेने महायुतीला नाकारल्याचे पहायला मिळाले. जर मतदानाची टक्केवारी आणि स्ट्राईक रेट पाहिल्यास भाजपला सगळ्यात मोठा फटका या निवडणुकीत बसल्याचे बघायला मिळाले. आता महाराष्ट्रातील याच जनमताचा कानोसा घेऊन सगळे राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक दौऱ्याची सुरूवात करताना सोलापूर येथे पत्रकार परिषदेत बोलताना महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही, महाराष्ट्रात भूमिपुत्रांना नोकऱ्या, चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे. मग, तो ओबीसी, मराठा किंवा कुठल्याही जातीचा असो.

महाराष्ट्रात मुला-मुलींना चांगलं शिक्षण, रोजगार मिळाला पाहिजे. मग यात जात येते कुठे? महाराष्ट्रात किती शैक्षणिक संस्था आहेत? तिथे आरक्षण आहे का? आरक्षण किती जातींना मिळणार? किती नोकऱ्या उपलब्ध होणार? हे आपण तपासणार आहोत का? असे अनेक सवाल राज यांनी उपस्थित करताना, एकनाथ शिंदे, नरेंद्र मोदी यांच्यावरदेखील टीका केली आहे. राज यांना जनतेला कौल कळतो यापूर्वी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचा झालेला पराभव व काँग्रेसला मिळालेल्या विजयाचे श्रेय हे राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला दिले होते. मात्र राज्याच्या राजकारणात राज ठाकरे यांची भूमिका ही नेहमी संभ्रमीत करणारी राहिली आहे.

लोकसभा निवडणुकीला एक ही जागा न लढवता केवळ नरेंद्र मोदी यांच्यासाठी बिनशर्त पाठिंबा राज यांनी दिला होता, आता तेच राज ठाकरे भाजप व त्यांच्या नेत्यांवर टीका करताना दिसत आहे.दुसरीकडे वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही खरी शिवसेना असल्याचे बोलताना उध्दव ठाकरे यांचा स्ट्राईक रेट हा आरक्षणवादी व मुस्लिम मतदारांमुळे वाढला असल्याचे आंबेडकर म्हणाले, तर समाज दुभंगणारी वक्तव्ये करणाऱ्या राज यांना तुरूंगात टाकुन त्यांच्यावर टाडा लावण्याची मागणीही प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

राज्यातील आरक्षणवादी आणि मुस्लिम हा काँग्रेसचा पारंपारिक मतदार आता शिवसेना ठाकरे गटाकडे वळला आहे. तर हिंदुत्ववादी मतदार हा भाजपपेक्षा शिवसेना शिंदे गटासोबत असल्याचे लोकसभा निवडणुकीत दिसल्याने बाकी राजकीय पक्षांची मोठी अडचण झाली आहे. 400 पारचा नारा देताना भाजप संविधान बदलणार असा प्रचार विरोधकांनी केला. त्यातच महाआघाडीसोबत न जाता स्वतंत्र लढणाऱ्या वंचितला मतदारांनी नाकारले. लोकसभेला शिवसेना उध्दव ठाकरेंसोबत आघाडी करणाऱ्या आंबेडकर यांनी जागा वाटपाबाबत तोडगा न निघाल्याने महाविकास आघाडीसोबतची युती तोडली व स्वबळावर निवडणूक लढवली, मात्र 2019 च्या तुलनेत त्यांना म्हणावे तसे यश या निवडणुकीत मिळाले नाही. प्रकाश आंबेडकर वगळता एक ही उमेदवार दोन लाखांचा आकडा गाठू शकला नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक ही प्रकाश आंबेडकर व राज ठाकरे या दोन्ही नेत्यांसाठी महत्त्वाची असणार आहे. नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणात बच्च कडु यांच्या प्रहार संघटनेचे दोन, एमआयएमचे दोन व समाजवादी पक्षाचे दोन आमदार निवडुन येत असताना, मनसे व वंचितची भूमिका ही नेहमीच निवडणूकपूर्व महत्त्वाची ठरते. निवडणुकीनंतर मात्र त्यांच्या भूमिकेला महत्त्व राहत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वसामान्य जनतेला तुम्ही सत्ताधारी बनु शकता असा विश्वास दिला, त्याच दिग्गजांचा वारसा असणाऱ्या या दोन नेत्यांच्या नेतृत्वाची दिशा सातत्याने बदलल्याचे बघायला मिळाले. या दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या भूमिका या नेहमीच आघाडी किंवा युतीसाठीच निर्णायक ठरत आहेत. राज ठाकरे यांनी आता स्वबळाचा नारा देताना दोन उमेदवारांची घोषणा केली, आता वंचित स्वतंत्र लढणार, युती किंवा आघाडीसोबत जाणार की तिसऱ्या आघाडीचा प्रयोग करण्यासाठी पुढाकार घेणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

प्रवीण काळे

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article