For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नितीश कुमारांसंबंधी पुन्हा संभ्रम !

06:16 AM Jan 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
नितीश कुमारांसंबंधी पुन्हा संभ्रम
Advertisement

रालोआत प्रवेशाची चर्चा गरम, राजकीय वर्तुळात उत्सुकता

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार पुन्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीत येत आहेत काय ? हा प्रश्न सध्या बिहार आणि दिल्ली अशा दोन्ही ठिकाणच्या राजकीय वर्तुळाच चर्चिला जात आहे. कुमार विरोधी पक्षांच्या आघाडीत समाधानी नाहीत, असे वृत्त असून त्यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत परतण्याचा मार्ग मोकळा ठेवला आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे बिहारच्या राजकारणात पुन्हा उलटफेर होणार अशी अटकळ बांधली जात आहे.

Advertisement

काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षांच्या आघाडीची ऑन लाईन बैठक झाली होती. त्यावेळी नितीश कुमार यांना आघाडीचे संयोजकपद द्यावे, असा प्रस्ताव मांडला गेला होता. तथापि, त्यांनी हे पद स्वीकारण्यास नकार दिल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. त्याच बैठकीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची निवड आघाडीच्या अध्यक्षपदी करण्यात आल्याचेही वृत्त होते. तथापि, नितीश कुमार यांनी संयोजकपद नाकारल्याने ते आघाडीत नाराज असल्याची चिन्हे दिसू लागली होती. मात्र, त्यावेळी सारवासारवी करुन पडदा टाकण्यात आला होते.

पुन्हा मतभेद

कुमार यांनी संयोजकपद नाकारल्यानंतर काही दिवसांनी राजदचे नेते लालू प्रसाद यादव आणि त्यांच्यात वाद निर्माण झाला होता. कुमार यांनी आघाडीचे जागावाटप लवकरात लवकर करावे असा आग्रह धरला होता. तर लालू यादव यांनी जागावाटपाची प्रक्रिया दीर्घकाळ चालणार असून ते लवकर करता येणे शक्य नाही, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे पुन्हा समीकरण डळमळीत झाले होते. शुक्रवारी लालू यादव आणि तेजस्वी यादव यांनी कुमार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. आघाडीत सारे काही अलबेल असल्याचा दावा नंतर यादव यांनी केला. तथापि, कुमार यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त न करण्यात आल्याने प्रश्नचिन्ह कायम आहे. केव्हा काय होईल हे निश्चित नाही, अशी स्थिती आहे.

भाजप विधायक दलाची बैठक

नितीश कुमार कोणताही निर्णय घेऊ शकतात, अशी चिन्हे दिसू लागल्यानंतर बिहारमध्ये भारतीय जनता पक्षाच्या विधायक दलाची बैठक घेण्यात आली आहे. कुमार परत येणार असल्यास आणि भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने मान्यता दिल्यास त्यांचे स्वागत केले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

कुमार यांच्या भेटीगाठी

कुमार नियमितपणे आपल्या आमदारांशी संपर्कात आहेत. चर्चासत्रे होत आहेत. काही आमदारांनी सूचक विधाने केल्याने कुमार यांचे विरोधी पक्षांच्या आघाडीतील अस्तित्व प्रश्नचिन्हांकित झाल्याचे दिसत आहे. बिहारमध्ये लवकरच मोठा भूकंप राजकीय क्षेत्रात होण्याची शक्यता आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

अमित शहांकडून मार्ग मोकळा ?

नितीश कुमार यांच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी प्रवेशाला केंद्रीय गृहमंत्री आणि  भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांचा पाठिंबा आता आहे, असेही सूत्रांचे म्हणणे आहे. गेल्यावर्षी एप्रिलमध्ये शहा यांनी बिहारमधील एका जाहीर सभेत कुमार यांना दरवाजे बंद असल्याची घोषणा केली होती. तथापि, राजकारणात काहीही घडू शकते, हे पाहता कुमार पुन्हा भारतीय जनता पक्षाकडे झुकण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही, असे तज्ञांचे मत आहे.

कधी होणार ‘धमाका’ ?

विरोधी पक्षांच्या आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय कुमार यांनी घेतलाच असेल तर तो प्रत्यक्षात कधी आणला जाणार, हा प्रश्नही चर्चिला जात आहे. यासंबंधी निश्चित वृत्त हाती आलेले नाही. पण दोन-तीन दिवसांमध्ये यासंबंधीचे चित्र स्पष्ट होईल, अशी शक्यता दिल्ली आणि बिहार येथे व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisement
Tags :

.