जेपीसीच्या बैठकीत पुन्हा गोंधळ
विरोधी पक्षांच्या खासदारांचा वॉकआउट : लोकसभा अध्यक्षांना लिहिले पत्र
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
वक्फ विधेयकावर स्थापन संयुक्त संसदीय समितीच्या (जेपीसी) बैठकीत मंगळवारी देखील मोठा गोंधळ झाला. पुन्हा एकदा विरोधी पक्षांच्या खासदारांनी बैठकीतून वॉकआउट केला आहे. विरोधी पक्षांच्या खासदारांनी भाजप खासदारांवर आक्षेपार्ह भाषेच्या वापराचा आरोप केला आहे. यादरम्यान समितीचे अध्यक्ष जगदंबिका पाल यांनी भाजप खासदारांवर कुठलीच कारवाई केली नसल्याचा दावा विरोधी पक्षांच्या खासदारांनी केला आहे. तर आक्षेपार्ह भाषेचा वापर विरोधी पक्षांच्या खासदारांकडून करण्यात आल्याचा दावा भाजप खासदारांनीही केला आहे.
विरोधी पक्षांच्या खासदारांनी जेपीसीच्या अध्यक्षांच्या विरोधात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिले आहे. सोमवारी झालेल्या बैठकीत संसदीय आचारसंहितेचे उल्लंघन करण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षांच्या खासदारांनी केला आहे. सोमवारी झालेल्या बैठकीत देखील मोठा गोंधळ झाला होता.
सोमवारी देखील विरोधी पक्षांच्या खासदारांनी जेपीसी बैठकीवर बहिष्कार टाकला होता. बैठकीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे प्रकरण उपस्थित करण्यात आले होते. समितीचे कामकाज नियम आणि प्रक्रियांनुसार होत नसल्याचे विरोधी पक्षांच्या खासदारांचे म्हणणे आहे. काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई आणि इम्रान मसूद, द्रमुकचे ए. राजा, शिवसेना (युबीटी) खासदार अरविंद सावंत, एआयएमआयएमचे असदुद्दीन ओवैसी, सपचे मोहिबुल्लाह आणि आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला होता.
समितीसमोर हजर राहणाऱ्या व्यक्तींना वैयक्तिक आरोप करण्याची अनुमती देण्यात आली होती. यात काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांच्या विरोधात आरोप करण्यात आले. समितीचे कामकाज नियमांच्या अंतर्गत होत नसल्याचा दावा अरविंद सावंत यांनी केला आहे.
खर्गे यांच्यावर वक्फ संपत्ती बळकावल्याचा आरोप
कर्नाटक राज्य अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष अन्वर मणिपेडी यांनी समितीसमोर 11 पानांचे सादरीकरण केले होते. यात त्यांनी वक्फची संपत्ती बळकावल्याचा आरोप असलेल्या नेत्यांचा उल्लेख केला होता. यात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव देखील सामील आहे. वक्फच्या 2.3 लाख कोटीच्या घोटाळ्याचा आरोप करणाऱ्या मणिपेडी समितीचा अहवाल 26 मार्च 2012 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री सदानंद गौडा यांना सादर करण्यात आला होता.