महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

संभ्रमित पक्ष आणि नेते विरुद्ध पवार

06:47 AM Sep 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

निवडणूक तोंडावर आली असताना भाजपमध्ये नेतृत्व फडणवीस करणार की गडकरींचा चेहरा पुढे करावा लागणार याबाबत अद्यापही संभ्रमावस्था आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीतून लढायचे की अन्य कुठून याबद्दल खडे टाकून चाचणी घेण्यास आता तयार झाले आहेत. काँग्रेस पक्षाच्या सामुहिक नेतृत्वाला अचानक आपल्या मागे जनता आहे असे वाटून अधिकचे मतदारसंघ शोधायची गडबड सुरू झाली आहे. या सगळ्यांच्या गर्दीत एक नेता मात्र आपली निश्चित दिशा ठरवून त्या दृष्टीने वाटचाल करत आहे. शरद पवारांचे राजकारण या निवडणुकीत पुन्हा नव्याने उजळून निघत आहे.

Advertisement

Advertisement

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अचानक झालेला साक्षात्कार आणि पक्षाच्या दोन घरांमध्ये झालेल्या विभागणीनंतर कार्यकर्त्यांच्या घराघरात होणारी विभागणी अस्वस्थ करू लागली आहे, हे मान्य करणे म्हणजे यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आक्रमकपणे ‘साहेबांचा निर्णय मान्य करा’ असे सांगणारे अजित पवार हे नव्हेतच असे मान्य करायला लावणारे आहे! धर्मराव बाबा आत्राम यांना त्यांच्या कन्येने आव्हान देणे आणि नरहरी झिरवाळ यांना त्यांच्या पुत्राने आव्हान देणे दादांना अस्वस्थ करून गेले आहे. राज्यातील अनेक काका पुतण्यांचे वाद जनतेने अनुभवलेले असताना दादा अचानक असे दयाळू, कनवाळू भूमिकेत आलेले पाहून कोणीही आश्चर्यचकित होईल. पण, हा महिमा आहे दादांच्या मार्केटिंगची जबाबदारी घेतलेल्या कंपनीच्या रणनीतीचा. उलटे किंवा सुलटे कसेही असले तरी चर्चेत राहिले पाहिजे ही प्रतिमावर्धन करून देणाऱ्या कंपन्यांची भूमिका असल्यामुळे कडक शब्दात बोलणारे दादा गुलाबी जॅकेटात अवतरले तर अनाथांचे नाथ अचानक बहिणींचे लाडके भाऊ झाले. प्रतिमा अशाच बदलत असत्या तर लोकांना तात्कालीक राजकारणावरच निवडणुकांना सामोरे जाऊन यश खिशात टाकायची सवय लागली असती. मात्र महाराष्ट्राच्या निवडणुका आजही मुद्यावर होतात म्हणून बरे.

भाजपमधील संभ्रमावस्था

निवडणुका जवळ येतील तसे भाजपमध्ये नितीन गडकरी यांचे प्रस्थ वाढत असल्याचे दिसू लागले आहे. विनोद तावडे यांच्याकडे आलेली जबाबदारी, रावसाहेब दानवे यांच्याकडे सोपवलेली प्रचार यंत्रणा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा महाराष्ट्रासाठीचा दौरा आणि त्यामध्ये तिन्ही पक्षांमध्ये समन्वय राखण्याचे करण्यात आलेले आवाहन या सर्व पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शह देण्याचे काम काही प्रमाणात का होईना सुरू असल्याचे स्पष्ट दिसत आहे. तावडे यांच्या ठिकठिकाणच्या दौऱ्यानंतर विद्यमान आमदारांमध्ये पसरलेली नाराजी,

पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांनी अनेक मतदारसंघात दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांच्या उंचावलेल्या अपेक्षा यामुळे सर्वत्र इच्छुकांची भाऊ गर्दी झालेली दिसत आहे. मात्र त्यांच्यातून नेमका उमेदवार कशा पद्धतीने निवडला जाणार आहे याबाबत कोणाकडेही खात्रीने सांगण्यासारखे काही नसल्याने प्रत्येक ठिकाणच्या बैठका पुढे जाऊ लागलेल्या आहेत. इतर राज्यांमध्ये तिकीट वाटपावरून सुरू असलेली नाराजी लक्षात घेता महाराष्ट्रात आधीच सत्तेच्या विरोधात वातावरण असताना सुरू असणारे खेळ भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांना अस्वस्थ करणारे आहेत. बाहेरच्या पक्षातून आलेल्यांना मिळणारे प्राधान्य आणि यशस्वी असून देखील पक्षाच्या उमेदवारांना पर्याय शोधण्याचे सुरू असणारे प्रयत्न यामुळे भाजपमध्ये एक प्रकारचे अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाबाबतीत पक्षाची असणारी संभ्रमावस्था दूर झालेली नाही. त्याचा परिणाम पक्षाच्या संघटनेवर आणि एकूणच निवडणूक प्रक्रियेवरसुद्धा होताना दिसत आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत कोणाला डावलणार आणि कोणाला पुन्हा संधी मिळणार हे सांगणे खुद्द पक्षाच्या वरिष्ठ मंडळींनासुद्धा आता मुश्किल बनलेले आहे.

खडसेंचा आयाराम-गयाराम!

निवडणुकीच्या काळात भल्याभल्या मंडळींचे वस्त्रहरण होते. भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे गेली दहा वर्षे पक्षांतर्गत त्रासातून वाटचाल करत होते. शरद पवार यांनी साथ दिल्यामुळे त्यांची घसरण थांबली. मात्र लोकसभा निवडणुकीच्यावेळी सुनेला उमेदवारीच्या निमित्ताने खडसेंचे पुन्हा भाजपच्या दारात जाऊन उभे राहणे आणि भाजपने त्यांना टाळी न देणे त्यांच्या प्रतिमेस धक्का पोहोचणारे ठरले आहे. सुनबाई केंद्रात राज्यमंत्री असल्या तरी खडसेंना पक्षाची दारे बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे अखेर ‘प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माझा राजीनामा स्वीकारलेला नाही त्या अर्थी मी राष्ट्रवादीतच आहे’ असे सांगून खडसे यांनी स्वत:चे हसे करून घेतले आहे.

माणसं जोडणारे पवार

निवडणुकीच्या या धामधुमीत शांतपणे आपले जाळे विणण्यात गुंतलेले दिसताहेत ते एकमेव शरद पवार. कागलच्या गैबी पीर चौकातल्या सभेत सदाशिवराव मंडलिक यांची आठवण काढणे, सांगोल्यात गणपतराव देशमुख यांच्या कुटुंबात एकोपा साधणे, विजयसिंह मोहिते पाटलांच्या पाठोपाठ हर्षवर्धन पाटील, रामराजे निंबाळकर यांना खेचून आणणे असे अनेक चमत्कार त्यांनी घडवून दाखवला आहे. अशा काळात नुकतेच एक नेते पवारांना भेटायला गेले. त्यांना पवारांनी भेट दिली. मात्र शब्द दिला नाही. त्यांना पाठविणाऱ्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना त्यांनी निरोप दिला की, आपला एक ज्येष्ठ निष्ठावंत दिवंगत नेत्याचा पुत्र लढत असताना चुकीचा संदेश जाईल असे काहीही घडू नये अशी जबाबदारी पार पाडा. माणसांना जोडणाऱ्या पवारांचे आगळेपण यातून दिसते. निवडणूक काळात गर्दी अनेकांची होते. मात्र अशा गर्दीत आपली हक्काची माणसं हरवून जाऊ नयेत अशी काळजी पवारांनी या प्रकरणात घेतली. राज्यातील सर्वच नेते आणि पक्षांनी आपली मुळं विसरू नयेत हा पवारांचा संदेश मार्गदर्शक ठरावा. आपला विचार आपल्या पक्षात तरी शिल्लक राहिलेला दिसावा इतके जरी या निवडणुकीत जपले गेले तरी ही निवडणूक यशस्वी होईल.

 

शिवराज काटकर

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article